उन्हाळ्यात घाम आणि पावसाळ्यात पाणी यांमुळे होणारे त्वचाविकार, त्यांमागील कारणे आणि उपाय
१. त्वचेला एक प्रकारची बुरशी आल्याने होणारे त्वचाविकार
‘उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक जणांना किंवा स्थूल शरीरयष्टी आणि उष्ण प्रकृती असलेल्या व्यक्तींना अन्य वेळीही ‘खाज येणे, त्वचा लाल होणे, त्वचा काचणे (सोलली जाणे)’ आदी शारीरिक त्रास संभवतात. पावसाळ्यात दोन बोटांमधील त्वचेचा पाण्याशी अधिक वेळ संपर्क आला, तरीही वरील त्वचाविकार होतात. अशा प्रसंगी विविध मलमाच्या महागड्या ‘ट्यूब्स’ वापरल्या जातात. तरी बुरशी येण्याच्या मूळ अडचणीवर उपाय न योजल्याने काही दिवसांच्या अंतराने वरील त्रास वारंवार संभवतात.
२. त्वचेला बुरशी येण्याचे कारण
त्वचेचे घर्षण होत असलेल्या ठिकाणच्या (उदा. काखेतील) त्वचेवर घाम वा पाणी जास्त वेळ राहिल्याने तेथे एक प्रकारची बुरशी (फंगल इन्फेक्शन्स) येते.
३. काही घरगुती उपाय
अ. त्वचेचे घर्षण होणारा भाग सकाळी स्नानानंतर कोरड्या आणि सुती पंचाने नीट पुसावा.
आ. हाताच्या तळव्याच्या खोलगट भागात थोडेसे खोबरेल तेल घ्यावे आणि ते त्वचेचे घर्षण होणाऱ्या भागाला लावावे.
इ. बुरशी येण्याचे प्रमाण अधिक असल्यास वरील कृती रात्री झोपण्यापूर्वीही करावी.
ई. बुरशी येण्याचे प्रमाण अधिक असल्यास खोबरेल तेलाऐवजी देशी गाईचे तूप वापरू शकतो. तूप सर्वाधिक गुणकारी आहे.
४. नेहमी घ्यावयाची काळजी
अ. वरील त्वचाविकार होणाऱ्या व्यक्तींनी त्वचा नेहमी कोरडी ठेवावी.
त्या उद्देशाने नेहमी कोरडे आणि (न्यूनतम उन्हाळ्यात तरी) लेंगा, धोतर आदी सुती कपडे वापरावेत. त्यामुळे हवा त्वचेपर्यंत सहजतेने पोचते आणि सुती कापडामुळे घाम त्वरित टिपला जातो.
आ. कधीही दमट वा ओलसर कपडे वापरू नयेत.
इ. पावसाळ्यात शेतात वा अन्यत्र अधिक वेळ पाण्याशी संपर्क येणाऱ्या व्यक्तींनी सकाळी उठल्यावर त्वचाविकार होत असलेल्या ठिकाणी (बोटांमधील त्वचेला) पाण्याशी संपर्क येण्यापूर्वी शक्यतो समईच्या खाली साचणारे जळके (काजळीचे) तेल किंवा खोबरेल तेल लावावे.
रामनाथी आश्रमातील काही साधकांनी वरीलप्रमाणे उपाय चालू केल्यावर त्यांचा त्वचाविकाराचा त्रास दूर झाला.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२२)