गांधीवाद्यांनी महाराष्ट्र आणि देश यांची फसवणूक केली ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते
मुंबई – श्वास सोडतांना गांधी यांनी ‘हे राम’ म्हटले, असे सांगितले जाते; परंतु न्यायालयात सुनावणीच्या वेळी ‘गांधी यांनी श्वास सोडतांना कधीही ‘हे राम’ म्हटले नसल्याचे नथुराम गोडसेजी यांनी सांगितले. देशात एक मोठे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केला. गांधीवाद्यांनी महाराष्ट्र आणि देश यांची फसवणूक केली, असे वक्तव्य अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी केले. एस्.टी. कर्मचाऱ्यांची ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापनेच्या मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘‘नवाब मलिक यांची अद्यापही मंत्रीपदावरून हकालपट्टी का करण्यात आलेली नाही ? याचे सरकारने उत्तर द्यावे. ज्या रझा अकादमीने आझाद मैदानात आक्रमण केले, त्या रझा अकादमीच्या कामाचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण करावे. माझी यंत्रणेकडे मागणी आहे की, त्यांनी रझा अकादमीच्या कामाची चौकशी करावी. येत्या निवडणुकीत एस्.टी. कष्टकरी जनसंघाचे प्रचारक प्रचार करतील. येत्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या कर्जबाजाराविषयी माहिती देणार आहे.’’