भावभेट, ही चैतन्याची भेट ।
‘एकदा सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांना झालेला आनंद आणि मिळालेली शांती त्यांनी पुढील कवितेत वर्णन केली आहे.
भावभेट ही दिव्य भेट ।
आनंदाला भिडली थेट ।। धृ. ।।
बोल म्हणता बोलवेना ।
सांग म्हणता सांगवेना ।
मिटले माझे ओठ ।
ही भावभेट, ही भावभेट ।। १ ।।
ओलांडून मायेचा पाट (टीप १)।
चित्ज्ञानाची चालून वाट ।
सत्याचा मी चढले घाट ।
पडली आत्म्याची परमात्म्याशी गाठ ।
ही भावभेट, ही भावभेट ।। २ ।।
परम गुरूंचे (टीप २) होता दर्शन ।
प्रश्न पावले अंतर्धान ।
अहं, ‘मी’पणा गेला विरून ।
सागरात विरघळे मीठ ।
ही भावभेट, ही भावभेट ।। ३ ।।
द्वैत संपले अद्वैतात ।
नदी लोपली सागरात ।
अशी ही आत्मशांतीची लाट ।
भावभेट, ही चैतन्याची भेट ।। ४ ।।
टीप १ – प्रवाह
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे’
– सौ. शालिनी प्रकाश मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |