श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मडगाव (गोवा) येथील साधिका श्रीमती उपदेश आनंद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यावर त्यांचा मृत्यू येण्यातील अडथळे दूर होऊन त्यांनी शांतपणे प्राणत्याग करणे
‘२४.२.२०२२ या दिवशी सनातनच्या मडगाव, गोवा येथील साधिका श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) ((सौ. शौर्या मेहता (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) आणि सुश्री (कुमारी) दीपिका आनंद (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्या आई)) यांचे निधन झाले. निधनापूर्वी काही दिवस त्या रुग्णालयात होत्या. त्यांच्या निधनाच्या दिवशी माझी आई श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मनात ‘त्यांना रुग्णालयात जाऊन भेटावे’, असे आले. रुग्णालयातील त्यांच्या भेटीची आणि आनंदआजींच्या निधनानंतरची मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रुग्णालयात जाऊन श्रीमती उपदेश आनंद यांना भेटणे
१ अ. आनंदआजींना पाहिल्यावर ‘त्यांचा प्राण गळ्याच्या ठिकाणी अडकला आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना वाटणे आणि त्यांचा श्रीकृष्णाचा नामजप चालू होणे : ‘२४.२.२०२२ या दिवशी माझी आई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) रुग्णालयात जाऊन श्रीमती आनंदआजींना भेटली. त्या वेळी आईला वाटले, ‘श्रीमती आनंदआजींचा प्राण गळ्याच्या ठिकाणी (विशुद्ध चक्राच्या ठिकाणी) अडकला आहे.’ त्या वेळी आईचा आनंदआजींसाठी ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप चालू झाला. त्यानंतर आजींचा देह शांत होत गेला. आईने रामनाथी आश्रमातून नेलेली विभूती, तीर्थ आणि तुळशीपत्र आजींच्या कुटुंबियांना दिले. आश्रमातून निघतांना ‘वैकुंठातील तुळशीपत्र नेऊया’, असा विचार आल्याने आईने त्यांच्यासाठी तुळशीपत्र घेतले होते.
१ आ. ‘आजी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे त्यांचा साधनेचा पुढील प्रवास चालू झाला आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना वाटणे : आनंदआजींना बघून आईला वाटले, ‘त्या मायेतील सर्व गोष्टींपासून अनासक्त झाल्या असून त्या श्रीकृष्णाला ‘मला लवकर तुझ्या चरणांशी घे’, अशी प्रार्थना करत आहेत. त्यांचा श्रीकृष्णाचा नामजप चालू असून त्या श्रीकृष्णाच्या अनुसंधानात आहेत.’ ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे देवाने त्यांना मायेतील सर्व गोष्टींपासून अलगद बाहेर काढून त्यांचा साधनेचा पुढील प्रवास चालू केला आहे’, असेही आईला जाणवले. रुग्णालयातील त्यांच्या खोलीत आईला चांगली स्पंदने जाणवली.
२. ‘रात्री ९.४० वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मनात ‘आता आनंदआजींसाठी नामजप करण्याची आवश्यकता नाही’, असा विचार येऊन त्यांनी नामजप करणे थांबवणे आणि त्याच वेळी ‘आनंदआजींचे निधन झाले’, असे समजणे
आजींच्या कुटुंबियांशी थोडा वेळ बोलून रात्री ९.१० वाजता आई रुग्णालयातून आश्रमात येण्यास निघाली. तेव्हाही आईचा श्रीमती आनंदआजींसाठी करत असलेला नामजप चालू होता. रात्री ९.४० वाजता आईच्या मनात विचार आला, ‘आता नामजप करण्याची आवश्यकता नाही.’ तेव्हा तिने नामजप करणे थांबवले आणि मनातल्या मनात (काही कमी-अधिक झाले असल्यास क्षमायाचना म्हणून) त्रिवार विष्णुस्मरण केले. त्या वेळी ‘देवानेच मला रुग्णालयात जाण्याचा विचार देऊन तेथे नेले आणि आजींसाठी नामजपही करून घेतला’, असे आईला वाटत होते. तिने मनातल्या मनात ‘इदं न मम ।’ म्हणजे ‘हे माझे नाही’, असे म्हणून ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त केली. ‘गाडीतून येतांना आईने ज्या वेळी नामजप करायचे थांबवले, त्याच वेळी ‘आनंदआजींचे निधन झाले’, असे आश्रमात पोचल्यावर कळले.
३. पुरोहित-साधकाने सर्व विधी सुरळीत झाल्याचे सांगून आनंदआजींच्या निधनाच्या किंवा दहनाच्या वेळी त्यांना ‘पंचक नक्षत्र दोष’ अथवा ‘त्रिपाल नक्षत्र दोष’ लागला नसल्याचे सांगणे
२५.२.२०२२ या दिवशी आईने आजींच्या अंत्येष्टीसाठी गेलेले पुरोहित-साधक श्री. अमर जोशी यांच्याकडे ‘अंत्येष्टीविधी कसे झाले ?’ याची चौकशी केली. तेव्हा अमरदादांनी सांगितले, ‘‘सर्व विधी सुरळीत झाले आणि कोणताही (आध्यात्मिक) त्रास जाणवला नाही. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर निधनाच्या वेळी किंवा मृतदेहाच्या दहनाच्या वेळी ठराविक नक्षत्र असल्यास ‘पंचक नक्षत्र दोष’ अथवा ‘त्रिपाल नक्षत्र दोष’ लागू होतो. यापैकी कोणताही दोष आजींच्या निधनाच्या अथवा दहनाच्या वेळी लागला नाही, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’’
४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रुग्णालयात जाऊन आनंदआजींसाठी नामजप करणे आणि त्यानंतर आजींचे निधन सहजतेने होणे’, ही परात्पर गुरु डॉक्टरांचीच इच्छा असावी’, असे जाणवणे
त्या वेळी मला काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखातील महर्षींच्या पुढील वाक्याची आठवण झाली, ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात विचार आल्यावर तोच विचार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मनात आला’, हे गुरू-शिष्यांमधील एकरूपता दर्शवते.’ आईने रुग्णालयात जाऊन आनंदआजींसाठी नामजप केल्याने त्यांचे निधन सहजतेने झाले. ‘ही परात्पर गुरु डॉक्टरांचीच इच्छा असावी’, असे मला वाटले. ‘गुरु साधकांसाठी किती करतात !’ हे पाहून मला कृतज्ञता वाटली. गुरुदेव आईच्या माध्यमातून साधकांसाठी करत आलेल्या कार्याप्रतीही मला कृतज्ञता वाटली आणि ‘गुरूंचे सामर्थ्य किती असेल !’, असा विचार माझ्या मनात आला.
‘हे गुरुदेवा, तुम्हीच मला हे सर्व शिकण्याची संधी दिलीत आणि तुम्हीच माझ्याकडून हे लिहून घेतले, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ (वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |