पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि धर्मपालनाचा अभाव यांमुळे भारताची दु:स्थिती ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

नांदेड येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील होण्याचा निर्धार !

दीपप्रज्वलनाच्या वेळी डावीकडून श्री. सुधाकर टाक, पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, श्री. सुनील घनवट, अधिवक्ता सतीश देशपांडे

नांदेड – समृद्ध आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या भारताची दु:स्थिती होण्याचे कारण म्हणजे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण अन् धर्मपालनाचा अभाव ! हिंदु संतांवर अश्लाघ्य भाषेत टीका होते, तेव्हा सर्व माध्यमे त्याला प्रसिद्धी देतात; परंतु अन्य पंथियांमध्ये अशा घटना घडतात, तेव्हा त्याची कुठेही वाच्यता होत नाही. विदेशातील लोक भारतामध्ये येऊन हिंदु संस्कृतीचे आचरण करत हिंदु धर्माचा स्वीकार करत आहेत, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड येथे नुकतेच प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात नांदेड, परभणी, धर्माबाद येथील अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

अधिवेशनाच्या प्रारंभी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, इतिहास अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर टाक आणि समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी स्वत:च्या क्षेत्रामध्ये एकत्रित येऊन समानसूत्री उपक्रम राबवून हिंदु राष्ट्राचा विचार जागृत ठेवण्याचा निर्धार केला. अधिवेशनामध्ये अधिवक्ता सतीश देशपांडे, श्री. सुनील घनवट, ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. वैभव आफळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नांदेड येथील प्रतिष्ठित व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. गणेश महाजन, अधिवक्ता जगदीश हाके यांनी धर्मकार्य करतांना आलेले अनुभव कथन केले.

हिंदूसंघटनाविना पुढील पिढी सुरक्षित रहाणे अशक्य ! – हिंदुत्वनिष्ठ सुधाकर टाक

हिंदूंनी एकत्रित येणे ही काळाची आवश्यकता आहे. मी संत पाचलेगावकर महाराज यांचा शिष्य आहे. त्यांनीही हिंदू संघटनाचे कार्य केले होते. हिंदूंचे संघटन झाल्याविना पुढील पिढी सुरक्षित राहू शकत नाही.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये उपस्थित धर्माभिमानी

विशेष

१. या वेळी अधिवक्ता जगदीश हाके यांनी मागील काही वर्षांत हिंदुत्वनिष्ठांना केलेले साहाय्य आणि त्यांच्या अडचणी यांविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्य करतांना कोणत्या अडचणी येतात ? आणि त्यांना कशा पद्धतीने साहाय्य करावे ? याविषयीही माहिती दिली.

२. ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेवरील संकटांची भयावहता हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात आली. त्यावरून त्याविषयी जागृती करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची सिद्धता हिंदुत्वनिष्ठांनी दर्शवली.