अमरावती येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा !

  • अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा उपक्रम !

  • हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग

शोभायात्रेत सहभागी झालेले बालसाधक

अमरावती, ८ मे (वार्ता.) – येथे शहरात ३ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळामुळे दोन वर्षांनंतर शोभायात्रा झाल्याने शहरातील धर्मप्रेमींमध्ये विशेष उत्साह होता. शोभायात्रेत हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखेच्या धर्माभिमानी युवक-युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. सनातन संस्थेच्या वतीने बालसाधकांनी धर्मजागृतीविषयीच्या घोषणा दिल्या. त्यांनी प्रबोधनपर फलक हाती धरले होते. हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

क्षणचित्रे

१. शहरातील प्रसिद्ध अधिवक्ता श्री. ब्रजेश तिवारी, शोभायात्रेचे आयोजक अधिवक्ता श्री. प्रशांत देशपांडे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पश्चिम विदर्भ संघटनप्रमुख श्री. रमेश छांगानी यांनी शोभायात्रेत ‘सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांनी समाजोपयोगी देखावा ठेवावा’, असे निमंत्रण दिले होते. त्यामुळे दोन्ही उपक्रमांचे त्यांनी पुष्कळ कौतुक केले आणि संस्थेने सहभागी झाल्याविषयी नम्रपणे आभारही व्यक्त केले.

२. भाजपचे माजी जिल्हाप्रमुख आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. जयंत डेहनकर यांनी ‘बालकक्षाद्वारे समाजात जागृती झाली. अशी जागृती ठिकठिकाणी व्हायला हवी’, असे म्हणून उपक्रमाचे कौतुक केले.

३. अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. शाकाल तिवारी यांनी युवकांसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली.

४. रस्त्यावर दुतर्फा लोक गर्दी करून संस्थेचे देखावे बघत बालसाधक आणि युवा साधक यांचे कौतुक करत होते.