डॉ. टी.बी. कुन्हा यांनी सांगितलेली गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाच्या ऱ्हासाची कारणे !
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. आताही ‘झेवियर नव्हे, तर भगवान परशुराम गोव्याचा रक्षणकर्ता’, असे म्हटल्यावर पोर्तुगीजधार्जिण्या ख्रिस्त्यांना पोटशूळ उठला. गोमंतकियांवर अत्याचार करण्यास पुढाकार घेणारा फ्रान्सिस झेवियर त्यांना ‘गोयंचो सायब’ वाटतो. हे पाहून डॉ. टी.बी. कुन्हा यांचे विचार किती सत्य आहेत, याची प्रचीती येते. ७ मे या दिवशी आपण ‘विदेशी राजवटीच्या अधीन होण्याने गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास, गोमंतकियांची संपत्ती बळकावून त्यांचा वंश नाहीसा करणे, हाच पोर्तुगिजांचा उद्देश आणि गोमंतकीय भ्याड, चुगलखोर, दांभिक आणि खुशामतखोर बनणे’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
५. धर्मांतरासाठी राजसत्तेचे पाठबळ मागणारा झेवियर !
फ्रान्सिस झेवियरने गोव्यात अद्भुत धर्मांतर करवण्याचा चमत्कार घडवला, ही पोर्तुगीज साम्राज्याच्या प्रचारकांनी काल्पनिक कथा निर्माण केली; कारण आपले राज्य प्रस्थापित करण्याकरता सगळी धर्मांतरे सक्तीने आणि जबरदस्तीने घडवून आणली, हे त्यांना लपवायचे होते. गोव्यात त्याने धर्मांतरे केलीच नाहीत; कारण इथे त्याचा तात्पुरता मुक्काम असायचा, ही खरी वस्तूस्थिती आहे. सुदैवाने सेंट फ्रान्सिस झेवियरने स्वतः लिहिलेली पत्रे अजूनही जपून ठेवलेली असल्याने त्यातूनच ही गोष्ट स्पष्ट होते. २० जानेवारी १५४८ रोजी कोचीनहून, जेजुईट फादर सिमाव रॉड्रीग्ज यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आपल्याला त्याचा प्रांजळ कबुलीजबाब आढळतो आणि काही पत्रांत त्याची बऱ्याचदा पुनरावृत्तीही झालेली दिसून येते. तो म्हणतो की, शासनाच्या सक्रीय साहाय्याविना भारतियांना कॅथॉलिक धर्मात आणणे शक्यच झाले नसते. त्याचेच शब्द असे आहेत, ‘‘माझ्या अनुभवावरून, भारतात धर्माचा प्रसार करण्याचा एकच मार्ग आहे. राजाने भारतातील आपल्या सर्व अधिकाऱ्यांना हुकूम द्यावा की, जो आपल्या अखत्यारीतील सर्व अधिकार वापरून धार्मिक राज्य पसरवेल, तोच राजाच्या विश्वासास पात्र ठरेल. राजाने हुकूम दिलाच पाहिजे की, त्यांनी कन्याकुमारीच्या ख्रिस्त्यांची संख्या वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न केलाच पाहिजे, तसेच सर्व धार्मिक लोकांना आणि जे जे धर्माचा प्रसार करू शकतील अशा सर्वांना, मग ते आपल्या जेजुईट संघटनेचे सभासद असोत वा नसोत…राजाने हुकूमनामा काढून या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठी शिक्षा दिली, तर बरेच स्थानिक लोक येशु ख्रिस्ताचा पंथ कवटाळतील. नाहीतर यशाची अपेक्षा करता येणार नाही. … धर्माचा प्रसार करण्यापासून राजे आणि व्हाईसरॉय अलिप्त राहिले, तर काहीसुद्धा होणार नाही.’’ (पृष्ठ क्र. २९-३०)
(लेखातील प्रत्येक सूत्रानंतर दिलेले पृष्ठ क्रमांक हे पुढील पुस्तकातील आहेत. – ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ मूळ इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)