जर्मनीत दिवाळखोरीच्या लाटा पहायला मिळणार ! – कॉमर्ज बँक
फ्रँकफर्ट (जर्मनी) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अन् त्या अनुषंगाने रशियाच्या तेलावर विविध देशांनी घातलेली बंदी यांचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला दिवाळखोरीच्या विविध लाटांमधून जावे लागू शकते, असे वक्तव्य तेथील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ‘कॉमर्ज बँके’ने केले आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड नॉफ म्हणाले की, ऊर्जा पुरवठ्यावर संकट आहे, तसेच देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. जर्मनीच्या एक तृतीयांश विदेशी व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे जर्मन आस्थापनांना आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. आपण भ्रमात राहू नये. देशात दिवाळखोरीत निघण्याच्या आस्थापनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बँकांवरही धोका घोंघावत आहे.