यजमानांच्या आजारपणात यवतमाळ येथील साधिका सौ. सुनंदा हरणे आणि विदर्भ प्रभागाचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !
श्री. रवींद्र देशपांडे यांना आणि नंतर त्यांची पत्नी अन् आई यांना कोरोनाचा संसर्ग झाला. श्री. रवींद्र यांची स्थिती थोडी गंभीर असल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयात भरती करावे लागले. अशा वेळी श्री गुरुचरणी शरण जाऊन प्रार्थना करत श्रीमती धनश्री देशपांडे धिराने आलेल्या परिस्थितीला सामोरे गेल्या. वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी स्वतःला पुष्कळ स्थिर ठेवले. पुढे दुर्दैवाने श्री. रवींद्र यांची प्राणज्योत मालवली. श्री गुरूंना सतत शरण जाऊन परिस्थितीला दोष न देता धनश्री यांनी सर्व परिस्थिती स्वीकारली. यातून श्रीमती धनश्री यांची श्री गुरूंवर असलेली अढळ श्रद्धा दिसून येते. श्री गुरूंनीही त्यांना ‘त्यांचे प्रारब्ध भोगणे सुसह्य होईल’, असे सांभाळले. त्यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा आणि मनाची स्थिरता त्यांच्याच शब्दांत पाहूया.
१. श्री. रवींद्र यांना कोरोना होणे
१ अ. श्री. रवींद्र यांना ताप आल्याचे समजताच पू. पात्रीकारकाका आणि सौ. हरणे यांनी श्री. रवींद्र यांची विचारपूस करून त्यांना औषधोपचारासह नामजपादी उपायही करण्यास सांगणे : ‘२२.४.२०२१ या दिवशी श्री. रवींद्र यांना खोकला आणि ताप आला. उत्तरदायी साधिका सौ. सुनंदा हरणेमावशी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना हे कळल्यावर त्यांनी त्वरित मला भ्रमणभाष करून यजमानांची स्थिती जाणून घेतली. मंत्राचे उपाय सांगून त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्काळात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी असलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री गुरुदेव दत्त । – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप वाढवायला सांगितला. २४.४.२०२१ या दिवशी पू. पात्रीकरकाकांशी एका सत्संगाच्या संदर्भात बोलणे झाल्यावर त्यांनीही श्री. रवींद्र यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आणि नामजपादी उपाय सांगितले. नंतर सलग होणाऱ्या वैद्यकीय घडामोडींचा सौ. हरणेमावशी नियमितपणे आढावा घेत होत्या. २९.४.२०२१ या दिवशी आधुनिक वैद्यांनी श्री. रवींद्र यांचे ‘सी.टी. स्कॅन’ करायला सांगितले. ‘सी.टी. स्कॅन’चा अहवाल आल्यावर आधुनिक वैद्यांनी त्यांना कोरोना झाल्याचे निदान केले. ‘पू. पात्रीकरकाका आणि सौ. हरणेमावशी यांनी केलेले साहाय्य पाहून त्यांच्या माध्यमातून श्री गुरुच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) आधार देत आहेत’, असे मला जाणवत होते.
१ आ. रुग्णालयात भरती करतांना कुठेही जागा न मिळणे, ही अडचण पू. पात्रीकरकाकांना सांगितल्यावर ५ मिनिटांत एका रुग्णालयात जागा उपलब्ध होणे : ३०.४.२०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता कोरोना ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’ (RT-PCR) ही कोविड चाचणी करण्यासाठी गेल्यानंतर आधुनिक वैद्यांनी लवकरात लवकर रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. श्री. रवींद्र यांची स्थिती पाहून आम्ही सर्वच कुटुंबीय घाबरून गेलो होतो. त्या वेळी ४ – ५ रुग्णालयांत फिरल्यानंतरही कुठेही खाट उपलब्ध झाली नाही. त्यानंतर एका सेवेच्या संदर्भात पू. पात्रीकरकाका यांच्याशी बोलतांना मी त्यांना खाट मिळण्यात येत असलेली अडचण सांगितली. त्यांच्याशी बोलल्यानंतर ५ मिनिटांत खाट मिळाल्याचा निरोप आला. संतांसमोर अडचण मांडल्यानंतर ती लगेचच सुटली. त्यामुळे मनात प.पू. गुरुदेव आणि पू. पात्रीकरकाका यांच्याविषयी कृतज्ञता भाव दाटून आला.
१ इ. ‘वर्तमानकाळात रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना होणे : श्री. रवींद्र यांना रुग्णालयात भरती करतांना मनावर दडपण आले होते. त्या वेळी पू. पात्रीकरकाका यांनी मार्गदर्शनात सांगितलेले सूत्र आठवले आणि ‘जी परिस्थिती समोर येईल, ती मला स्वीकारता येऊ दे, वर्तमानकाळात रहाता येऊ दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना झाली.
१ ई. श्री गुरुकृपेने रुग्णालयाने आगाऊ रक्कम भरण्याविषयी न सांगणे, उपचारानंतर श्री. रवींद्र यांना कोरोना झाला नसल्याचा चाचणीचा अहवाल येणे आणि रुग्णालय पालटतांनाही रुग्णालयाने देयक न मागणे : श्री गुरुकृपेने रुग्णालयाने यजमानांना अतिदक्षता विभागात भरती करतांना आम्हाला आगाऊ रक्कम भरण्यास सांगितली नाही. वैद्यकीय औषधोपचारांनी त्यांची प्रकृती सुधारली. त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचा अहवाल आला. त्यानंतर आम्ही कोविड रुग्णालय पालटून त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जातांनाही रुग्णालयाने आमच्याकडे वैद्यकीय उपचारांचे देयक मागितले नाही. या प्रसंगातही आम्ही ‘प.पू. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा अनुभवली.
१ उ. पू. पात्रीकरकाकांशी बोलण्यामुळे धीर येणे : श्री. रवींद्र यांना कोविड रुग्णालयात भरती केल्यानंतर पू. पात्रीकरकाका आणि सौ. हरणेमावशी यजमानांचा स्वास्थ्य आढावा नियमित घेत असत. प्रत्येक वेळी बोलतांना सौ. हरणेमावशी आणि पू. पात्रीकरकाका यांनी मला धीर दिला. ‘सकारात्मक राहून नामजपादी उपाय सर्व कर. प.पू. गुरुदेव आपल्या पाठीशी आहेत’, असे ते मला सतत सांगत असत. ‘यजमान रुग्णालयात आहेत’, याचा मला ताण आला होता; परंतु पू. पात्रीकरकाकांशी बोलल्यावर मला धीर आला.
२. कुटुंबातील सर्वांची कोरोनाची चाचणी केली जाणे, त्यात सासूबाईंना आणि स्वत:ला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अन् मुलांना संसर्ग नसल्याचा अहवाल येणे
‘यजमानांना रुग्णालयात भरती केल्यावर आम्हा कुटुंबियांनाही ‘आर्.टी.-पी.सी.आर्’ (RT-PCR) चाचणी करणे अत्यावश्यक होते. या कालावधीत आम्हा कुटुंबियांची स्थिती चांगली नसतांना माझे सातत्याने ‘प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राशी बोलणे आणि त्यांना आत्मनिवेदन करणे’, हे प्रयत्न वाढले होते. मला आणि सासूबाईंना कोरोना झाल्याचा, तर दोन्ही मुलांना कोरोना नसल्याचा अहवाल आला. येथेही परम दयाळू गुरुमाऊलीने आमच्यावरील संकटांची तीव्रता अल्प केली. मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असता, तर आमच्या अडचणी आणि ताण प्रचंड वाढला असता. सर्व विश्वाची ती परात्पर गुरुमाऊली माझ्या रक्षणासाठी धावून आली.
३. पू. पात्रीकारकाकांनी पुन्हा मंत्रजप आणि नामजपादी उपाय सांगणे
पू. पात्रीकरकाकांनी आमच्यासाठी नामजप अन् मंत्र यांचे उपाय करायला सांगितले. या सर्व परिस्थितीशी लढण्याचा मनावर प्रचंड ताण होता; ‘पण काय होईल ?’, याची चिंता मला कधी वाटली नाही. ते केवळ श्री गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच !
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त दाखवलेली ध्वनीचित्र-चकती पहाणे आणि त्या वेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून प्रारब्धभोग भोगण्यासाठी क्षमता मिळणे, ‘त्यांच्या जीवनदर्शन ग्रंथातून ते स्थुलातून सतत समवेत आहेत’, असे जाणवणे
२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरुमाऊलीच्या जन्मोत्सवानिमित्त परमानंद देणाऱ्या गुरुमाऊलीच्या सत्संगाची ध्वनीचित्र-चकती ऐकायला मिळाली. त्या वेळी साधकांनी विचारलेल्या एका शंकेचे निरसन करतांना गुरुदेवांनी सांगितले, ‘‘वर्तमानकाळात रहायचे. इतर विचार करायचे नाहीत आणि प्राप्त परिस्थिती स्वीकारायची.’’ संपूर्ण कार्यक्रमाच्या कालावधीत ‘जणूकाही ते मार्गदर्शन माझ्यासाठीच आहे’, असे मला जाणवत होते. प्रत्येक साधकच नाही, तर चराचराकडे लक्ष असणाऱ्या गुरुमाऊलीने मला त्या मार्गदर्शनातून जणू प्रारब्धभोग भोगण्यासाठी बळ दिले. सत्संग झाल्यावर माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी तळमळीने प्रार्थना झाली, ‘हे गुरुराया, मला सतत वर्तमानकाळात रहाता येऊ दे आणि प्राप्त परिस्थिती स्वीकारता येऊदे.’ माझ्याकडून दिवसातून किमान ५ वेळा ही प्रार्थना होत असे. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन – खंड १’ हा ग्रंथ मला ‘प.पू. गुरुदेव स्थुलातून सतत माझ्या समवेत आहेत’, याची जाणीव करून देत असे.’ (क्रमशः)
– श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२१)