मुख्याधिकार्यांच्या दालनात कचरा टाकण्याची वेंगुर्लाचे माजी नगराध्यक्ष गिरप यांची चेतावणी
स्वच्छता कामगारांअभावी वेंगुर्ला शहरात अस्वच्छता
वेंगुर्ले – नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता नगरपरिषदेतील ६० कंत्राटी स्वच्छता कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कामगार आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहेत. गेले काही दिवस शहरातील कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचरा साठला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कचराच उचलला जात नसल्याने नागरिकांनीही स्वच्छता कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ८ दिवसांत या कंत्राटी स्वच्छता कामगारांविषयी निर्णय न झाल्यास शहरातील कचरा मुख्याधिकार्यांच्या दालनात टाकण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली. वेंगुर्ला भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भाजपचे सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर आदी उपस्थित होते.
दिलीप गिरप पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१६ ते २०२१ या कालावधीत भाजपची सत्ता होती. या काळात आम्ही ही स्वच्छतेची कामे पुढे चालू ठेऊन त्यावर कळस रोवल्याने नगरपरिषदेला आतापर्यंत १५ कोटी रुपयांची बक्षिसे मिळाली. वेंगुर्ला नगरपरिषदेत केवळ २८ कायमस्वरूपी स्वच्छता कामगार आहेत. कंपोस्ट डेपो, गार्डन, रस्ते, ६ घंटागाड्या, सक्शन व्हॅन यांसाठी म्हणून ६० कंत्राटी स्वच्छता कामगार नेमण्यात आले होते. त्यांना १४ आणि १५व्या वित्त आयोगातून वेतन देण्याचे ठरले होते; मात्र हा निधी ७ ते ८ मासांपूर्वी संपला. त्या वेळी सव्वा कोटी बक्षिसाच्या रकमेतून त्यांना वेतन देण्याचे ठरले आणि तसा प्रस्ताव मंत्रालयात संमत करून आणल्याने नोव्हेंबर ते एप्रिल या काळात या कामगारांचे वेतन या बक्षिस रकमेतून करण्यात आले. अजूनही नगरपरिषदेकडे सव्वा पाच कोटी रुपये बक्षिस रकमेतील आहेत. नगरपरिषदेने तसा प्रस्ताव करून त्याला प्रशासकीय मान्यता घेतली असती, तर कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वेळ आली नसती.’’