ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
एकदा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले एका सत्संगात म्हणाले होते, ‘सर्वसामान्य साधकाने लोकांना अध्यात्माविषयी बुद्धीच्या स्तरावर कितीही पटवून सांगितले, तरी त्याचा लोकांवर परिणाम व्हायला वेळ लागतो; परंतु संतांनी एक वाक्य जरी सांगितले, तरी त्यांच्या बोलण्यातील चैतन्यामुळे लोकांच्या अंतर्मनावर संस्कार होऊन त्यांच्यावर लवकर सकारात्मक परिणाम होतो.’ सनातनच्या ग्रंथांच्या संदर्भातही हेच तत्त्व लागू होते; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे अत्युच्च कोटीतील संत सनातनचे ग्रंथ संकलित करत असल्याने ते ग्रंथ म्हणजे साक्षात् चैतन्याचे स्रोतच आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या चैतन्यमय ग्रंथकार्याच्या संदर्भातील विविध पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. या दुसऱ्या लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथांविषयी असणारा भाव’ आणि ‘ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे घडलेले गुणदर्शन’ या पैलूंविषयी सांगितले आहे.
लेखांक २ (भाग १)
संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ग्रंथांविषयी असणारा भाव
अ. ‘लेखक’ नव्हे, तर ‘संकलक’ ! : डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) अनेक भजने लिहिली; पण केवळ २ – ३ भजनांमध्येच स्वतःचे नाव घालणे आवश्यक होते; म्हणून त्यांनी ते घातले होते. सनातनच्या ग्रंथ-निर्मितीचा आरंभ झाल्यापासून परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक ग्रंथावर स्वतःचे नाव ‘लेखक’ म्हणून न घालता ‘संकलक’ म्हणून घातले आहे. ‘ग्रंथाविषयीचे सर्व ज्ञान गुरुच सुचवत असल्याने ग्रंथांचे कर्तेपण आणि लेखकत्व स्वतःकडे घेता येत नाही’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा भाव असल्यामुळे ते ‘संकलक’ म्हणून नाव घालतात.
२. ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले गुणदर्शन !
२ अ. काटकसरीपणा
२ अ १. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर : मुंबई येथील सेवाकेंद्रात संगणकीय प्रती काढण्यासाठी एकच ‘डॉट मॅट्रिक्स प्रिंटर’ होता. त्याच्या शाईची ‘रिबिन’ वारंवार ‘रिफील’ करून अनेक वर्षे तोच ‘प्रिंटर’ वापरला. पुढे पुढे तीच तीच ‘रिबिन’ पुन्हा वापरल्यामुळे संगणकीय प्रतींवरील अक्षरे जरा पुसट येत असत. मग लेखणीने (पेनने) ती अक्षरे गडद करून घ्यावी लागत. ‘सारखे सारखे नवीन ‘रिबिन’वर पैसे व्यय (खर्च) व्हायला नकोत, यासाठी जितके दिवस जुन्या ‘रिबिन’वरच काम चालू शकते, तितके दिवस काम चालवायचे’, असा यामागे परात्पर गुरु डॉक्टरांचा काटकसरीपणाचा दृष्टीकोन असायचा.
२ अ २. पाठकोरे कागद : परात्पर गुरु डॉक्टर ग्रंथांची सूत्रे लिहिण्यासाठी आजही औषधांच्या खोक्यांची आतील कोरी बाजू, पावत्यांची मागची बाजू, रद्दी कागद यांसारख्या वस्तूंचा ‘पाठकोरे कागद’ म्हणून उपयोग करतात. सेवाकेंद्रात असतांना मुंबईतील काही साधक पाठकोरे कागद परात्पर गुरु डॉक्टरांना ग्रंथसेवेसाठी आणून देत असत.
२ अ ३. कट-पेस्ट : पूर्वी ग्रंथ छपाईला देण्यासाठी ग्रंथाचे ‘बटर पेपर’ काढावे लागत. यानंतर ‘बटर पेपर’ पडताळण्याची (तपासण्याची) सेवा असे. त्या वेळी काही पानांवर सुधारणा लक्षात आल्या, तर त्या सर्व पानांचे परत ‘बटर पेपर’ काढण्यामध्ये अधिक पैसे व्यय होत असत. ते टाळण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व पानांवरचे असे चुकलेले शब्द, ओळी किंवा परिच्छेद यांची एका ‘बटर पेपर’वर एकत्रित प्रत काढून नंतर तेवढीच सुधारणा मूळ ‘बटर पेपर’वर ‘कट-पेस्ट’ करण्याची युक्ती शोधली. ही ‘कट-पेस्ट’ करण्याची सेवा पुष्कळ किचकट असून काळजीपूर्वक करावी लागे.
जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांसारखी विभूती निःस्वार्थी भावाने पै पै वाचवून धर्मकार्यासाठी धनसंचय करते, तेव्हा ते कार्य त्या विभूतीचे रहात नसून ईश्वराचेच होते आणि ईश्वरच ते कार्य चालवतो ! आज सनातन संस्था हेच अनुभवत आहे.
२ आ. समाजाला ग्रंथ अल्प मूल्यात देण्याची तळमळ : ग्रंथ-निर्मितीच्या आरंभीच्या काळात काही ग्रंथ एका मुद्रणालयात छापून घेतले. त्या ग्रंथांचे छपाईमूल्य पुष्कळ अधिक असायचे, उदा. ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथाचे छपाईमूल्य ३१ रुपये इतके पडले होते. सर्वसामान्य वाचकांना ग्रंथ महाग पडतील; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या वेळी ‘अल्प मूल्यात ग्रंथ छापून देऊ शकेल’, असे मुद्रणालय शोधायला सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या या तळमळीमुळे पुढे चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील एक मुद्रक स्वतःहून मुंबई येथे आले आणि धर्मकार्याला साहाय्य म्हणून त्यांनी ग्रंथ अल्प मूल्यात छापून देण्याची सिद्धता दर्शवली. यामुळे ३१ रुपयांना पडणारा ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ केवळ ७ रुपयांना पडला ! अशा प्रकारे सनातनचे ग्रंथ स्वस्त झाले. पुढे मुंबई येथील ‘सुप्रेसा ग्राफिक्स’ या मुद्रणालयानेही अल्प मूल्यात ग्रंथ छापून दिले.
लोकमान्य टिळकांनी स्वतःचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ पुष्कळ मोठा असूनही सर्व समाजाला वाचता यावा, यासाठी त्याचे मूल्य अत्यंत अल्प ठेवले होते. लोकमान्यांसारखी लोककल्याणाची विलक्षण कळकळ परात्पर गुरु डॉक्टरांमध्येही दिसून येते. ‘ईश्वरी कार्य असेल, तर ते सुकर होण्यासाठी ईश्वरच त्या कार्यातील अडचणी कशा सोडवतो ?’, हेही वरील उदाहरणातून शिकता येते.
२ इ. गुरूंचे आज्ञापालन : प.पू. बाबांनी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, ‘‘एका मोठ्या ग्रंथापेक्षा निरनिराळ्या विषयांवर लहान-लहान ग्रंथ लिहा.’’ त्यानंतर आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक ग्रंथ याच धोरणानुसार बनवला आहे. काही वेळा एखाद्या ग्रंथाचा विषय एकत्रित प्रसिद्ध करणे सुलभ होणार असल्यामुळे आम्ही त्यांना ‘एकच मोठा ग्रंथ करूया’, असे सुचवतो; पण ते प्रत्येक वेळी ‘ग्रंथाचे २ – ३ भाग झाले, तरी चालतील; पण लहान-लहान ग्रंथ करूया’, असे आम्हाला सांगतात.
परात्पर गुरु डॉक्टर गुरूंच्या आज्ञेचे किती तंतोतंत पालन करतात, हे यातून शिकायला मिळते. गुरूंच्या आज्ञेचे शिष्याने तंतोतंत पालन केले, तरच गुरु त्यांचे सर्वस्व शिष्याला देतात !
(क्रमश: उद्याच्या अंकात)
प्रस्तुत लेखमालेतील सर्व लेख साधकांनी संग्रही ठेवावेत. ग्रंथ प्रदर्शने, ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ इत्यादी प्रसंगी जिज्ञासूंचे प्रबोधन करण्यासाठी या लेखमालिकेत दिलेल्या माहितीचा उपयोग होईल. – संपादक
(या संदर्भातील विस्तृत लिखाण सनातनच्या आगामी ग्रंथात प्रकाशित करण्यात येणार आहे. – संपादक) |