झारखंडमधील आय.ए.एस्. अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरांवर ‘ईडी’च्या धाडी !

सनदी लेखपालच्या घरातून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त

झारखंडमधील आय.ए.एस्. अधिकारी पूजा सिंघल (उजवीकडे)

रांची (झारखंड) – झारखंडच्या खाण आणि उद्योग सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या २४ हून अधिक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) एकाच वेळी धाडी टाकल्या. या वेळी पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या सनदी लेखापालकडून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून १५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत; मात्र यास अद्याप ‘ईडी’ने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. ६ मेच्या सकाळपासून ‘ईडी’ने ५ राज्यांत एकाच वेळी ही कारवाई केली.

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिकारी पूजा सिंघल यांची खुंटी आणि चतरा येथील ‘मनरेगा’ घोटाळ्याची चौकशी चालू आहे. मनरेगा घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’ने यापूर्वी कनिष्ठ अभियंता रामविनोद सिन्हा यांच्यावर कारवाई केली होती. रामविनोद यांच्या चौकशीत समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे ‘ईडी’ने पूजा सिंघल यांच्या भूमिकेचा तपास चालू केला होता.

संपादकीय भूमिका

सरकारने अशा भ्रष्ट अधिकार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !