साधनेद्वारे इच्छांवर मात कशी करावी ?
‘वैदिक धर्मशास्त्रामध्ये इच्छांची तृप्ती नाही, तर इच्छांच्या त्यागाला अधिक महत्त्व दिले गेले आहे; कारण इच्छांची तृृप्ती करणे म्हणजे एक प्रकारे ठिणगीला वारा घालून ती फुलवण्याचे कार्य करणे आहे. त्यामुळे आपण इच्छांच्या तृप्तीमध्ये जेवढे अधिक गुंतून जाऊ, तेवढ्याच प्रमाणात इच्छा अधिक जागृत होत रहातील.
१. विषयवासना आणि इच्छापूर्ती यांविषयी विविध धर्मग्रंथांत असलेले उल्लेख
१ अ. संत कबीर यांनी म्हटले आहे,
माया मुई न मन मुआ, मरी मरी गया सरीर ।
आसा त्रिसना न मुई, यों कही गए कबीर ।।
अर्थ : जगात ना माया मरते, ना मनावरचे संस्कार नष्ट होतात. शरीर मात्र न जाणो किती वेळा मृत झाले; परंतु मनुष्याच्या आशा आणि तृष्णा कधीच मरत नाहीत.
१ आ.
जीर्यन्ति जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः ।
चक्षुःश्रोत्रे च जीर्येते तृष्णैका तु न जीर्यते ।।
– महाभारत, पर्व १३, अध्याय १०, श्लोक २५
अर्थ : वृद्धावस्थेमध्ये केस, दात, नेत्र आणि कान इत्यादी सर्व इंद्रिये अकार्यक्षम होतात. मनुष्यामध्ये शक्ती रहात नाही; परंतु त्याची वासनेची तहान युवावस्थेतच रहाते.
तात्पर्य हे आहे की, मनुष्याच्या कामना, त्याची विषयभोगाची भूक कधीही पूर्ण होत नाही; म्हणून भारतीय संस्कृतीमधील एक सरळ आणि सर्वांना ठाऊक असलेला सिद्धांत आहे, ‘सन्तोषं परमं सुखम् ।’ म्हणजे ‘जे आहे, त्यात समाधान मानणे हेच परमोच्च सुख आहे.’ संतुष्ट जीव तृप्त आणि आनंदी रहातो. याच्या उलट भोगी जीव अशांत आणि दुःखी रहातो. खरे पहाता इच्छांमध्ये आसक्त मनुष्य त्यांचा केवळ दास होऊन जातो.
तेव्हा त्याला समयोचित पद्यमालिका नावाच्या ग्रंथात एक सुभाषित अशा प्रकारे आहे,
१ इ.
आशायाः ये दासास्ते दासाः सर्वलोकस्य ।
आशा येषां दासी तेषां दासायते लोकः ।।
अर्थ : जे इच्छांचे दास होतात, ते या जगाचे दास होतात आणि इच्छा ज्यांची दासी होते, संपूर्ण ब्रह्मांडात त्यांचे दास असतात.
ज्यांना इच्छाच नसल्यासारखे झाले असेल, ते सर्वत्र सन्माननीय आणि पूजनीय होतात, अशाच जीतेंद्रिय जिवाला ‘संत’ म्हणतात. वास्तविक इच्छा ही सर्व दु:खांचे मूळ कारण असते आणि अहंकारी व्यक्ती जी केवळ स्वतःचे सुख अन् दुःख यांचा विचार करते ती सर्वाधिक दु:खी असते.
१ ई. श्रीमद्भागवतात म्हटले गेले आहे –
अहं ममाभिमानोत्थैः कामलोभादिभिर्मलैः ।
वीतं यदा मनः शुद्धमदुःखमसुखं समम् ।।
– श्रीमद्भागवतपुराण, स्कंध ३, अध्याय २५, श्लोक १६
अर्थ : ज्या वेळी हे मन ‘मी आणि माझे’ या अभिमानाने उत्पन्न होणार्या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते, त्या वेळी ते सुख-दुःखापासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होते.
जेव्हा माझ्या मनातील अहंचे लोभ, काम इत्यादी रूपांत प्रकट होणारे संस्कार नष्ट होतात, तेव्हा व्यक्ती सुख-दुःखात समभावाने राहू लागते. इच्छा ही दु:खांची जननी असते आणि इच्छांवर नियंत्रण अन् त्यांचा नाश हेच आनंदाचे मूळ कारण आहे.
२. इच्छा नियंत्रित करण्यासाठी काही दृष्टीकोन आणि प्रयत्न
२ अ. समाधानाने जीवन व्यतीत करणे
‘सन्तोषं परमं सुखम् ।’ म्हणजे ‘जे आहे, त्यात समाधान मानणे हेच परमोच्च सुख आहे.’
ईश्वराने जेवढे दिले ते पुरेसे आहे, असा विचार करून जीवन व्यतीत करावे. जेव्हा नवीन इच्छांचा जन्म होतो आणि त्यांच्या पूर्तीचे विचार मनात येतात, तेव्हा आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरील व्यक्तीकडे पहावे. ते त्या इच्छांची पूर्तता न करताच जीवन जगत करत आहेत, हे लक्षात घ्यावे.
२ आ. परेच्छेने वागण्याचा प्रयत्न करणे : स्वेच्छेपेक्षा परेच्छेने वागल्यामुळे मनातील इच्छा न्यून होतात आणि अहंसुद्धा न्यून होतो. असे करत राहिल्यामुळे ईश्वरेच्छेने वागणे साध्य होऊ लागते. आज सर्व घरांमध्ये क्लेश किंवा दुःख असण्याचे एक कारण हे सुद्धा आहे की, सर्व जण स्वतःच्या इच्छांनाच (स्वेच्छेला) महत्त्व देतात.
स्वतःची आवड-नावड यांना अत्यंत महत्त्व देणे, स्वतःच्या मनानुसार वागणे, धर्मापेक्षा काम आणि अर्थ यांना अधिक महत्त्व देणे, स्वतःच्या अहंला पुष्ट करण्यात सदैव मग्न रहाणे या सर्वांमुळे मनातील संस्कार आणखी बळकट होतात आणि नवीन इच्छांचा जन्म होतच रहातो; म्हणून या सूत्रांना लक्षात ठेवून योग्य वर्तन करावे. इच्छा आपोआप हळूहळू नियंत्रणात येऊ लागतात.
२ इ. भोगात नाही, तर त्यागात आनंद सामावलेला असतो ! : जर कोणती इच्छा उत्पन्न झाली, तर विचार करावा की, ‘खरेच ती इच्छा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे का ?’ जर असे असेल, तर ती इच्छा पूर्ण करावी. जर आपण एखाद्या वस्तूचा उपभोग घेत आहोत आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ अन् अधिक सुख देणारी वस्तू प्राप्त करण्याची इच्छा होत असेल, तर त्या वस्तूविना जीवन जगण्याची प्रवृत्ती मनात निर्माण करावी, उदा. तुमच्याकडे एक घर आहे, तरीही तुम्हाला आणखी घर विकत घ्यायची इच्छा होत असेल, तर तुमची आसक्ती वाढतच राहील.
लक्षात ठेवा, जेवढ्या अधिक वस्तू तुमच्याजवळ असतील, तेवढे तुमच्या मनात अधिक विचार येत रहातील आणि ते सांभाळण्यात तुमचे अमूल्य मनुष्यजीवन व्यर्थ जाईल. भोगात नाही, तर त्यागात आनंद सामावलेला असतो, हे सूत्र मनावर वारंवार बिंबवत रहावे. ज्या विषयात अत्यधिक आसक्ती असेल, तिचा त्याग करायला शिकावे. त्यामुळे आसक्ती आणि ते भोगण्याची इच्छा दोन्हीही न्यून होईल.
२ ई. इच्छांवर विजय प्राप्त करण्यासाठी मनाला स्वयंसूचना देणे : इच्छा अनंत असतात; म्हणून त्या १०० टक्के तृप्त होणे अशक्य असते. एक इच्छा पूर्ण झाल्यावर दुसरी इच्छा निर्माण होणे, हेच मनाचे हेच कार्य असते; म्हणून मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वयंसूचना द्यावी. ‘हे मनुष्यजीवन इच्छांना तृप्त करण्यासाठी नसून साधना करून इच्छांवर विजय प्राप्त करण्यासाठी आहे’, अशी मनाला वारंवार स्वयंसूचना द्यावी.
२ उ. मनाला नियंत्रित करण्यासाठी साधना करावी !
मैत्रायणी उपनिषदमध्ये म्हटले आहे –
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो: । – मैत्रायण्युपनिषद्, प्रपाठक ४, श्लोक १४
अर्थ : मन हेच मनुष्यांच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे.\
मन हेच इच्छांचे जन्मस्थान असते आणि या इच्छाच बंधनाचे कारण आहेत. जर मनाला इच्छा आणि विषय यांच्या आसक्तीपासून मुक्त केले, तर तेच मन मुक्तीचे कारण बनते; म्हणून मनाला नियंत्रित करण्यासाठी योग्य साधना आरंभ करावी.
२ उ १. देवतेचे नामस्मरण करणे : अखंड नामस्मरण करावे. त्यामुळे मनात नवीन संस्कार निर्माण होत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीत आतूनच योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन प्राप्त होतो. यामुळेच इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास साहाय्य होते.
२ उ २. संतांच्या देहातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांमुळे मनोदेहाची शुद्धी होत असल्याने संत सान्निध्यात रहावे ! : संत सान्निध्यात राहून त्यांच्या कार्यासाठी यथाशक्ती योगदान द्यावे. ज्याप्रकारे कर्करोगाच्या पेशी क्ष-किरण म्हणजे रेडिएशनमुळे नष्ट होतात, त्याचप्रकारे संतांच्या शरिरातून निघणार्या स्पंदनांनी मनोदेहाची शुद्धी होते; कारण संत अधिकांश वेळ निर्विचार अवस्थेत रहातात आणि जे निर्विचार रहातात, तेच तुम्हाला निर्विचार अवस्थेची अनुभूती देऊ शकतात.
२ उ ३. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करावी ! : ‘गुरूंचे मुख्य कार्य आहे, ‘मन, बुद्धी आणि अहं यांचा लय करणे, म्हणजे त्यांना नष्ट करणे.’ या तिन्हींच्या लयाची प्रक्रिया गुरु आपल्या संकल्पशक्तीने तेव्हाच करतात, जेव्हा साधकामध्ये शिष्याचे गुण येऊ लागतात अणि साधक गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करतो. मन निर्विचार करण्याचा हा सोपा आणि जवळचा मार्ग आहे; म्हणून गुरूंची कृपा प्राप्त होण्यासाठी योग्य प्रयत्न करावे. यासाठी स्वतःची कुलदेवता किंवा इष्टदेवता यांचा नामजप करत संतांच्या कार्यात यथाशक्ती योगदान द्यावे.
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (१९.११.२०२१)