यशामागील संघर्ष !
इंदूर येथील एक घटना सध्याच्या तरुणाईसाठी, विशेषतः प्रतिकूल स्थितीत शैक्षणिक भवितव्य घडवू पहाणार्यांसाठी निश्चितच आदर्श आहे. एका भाजी विक्रेत्याची मुलगी असणारी अंकिता नागर ही तरुणी इंदूरमध्ये दिवाणी न्यायाधीश झाली आहे. हे वाचून प्रत्येक भारतियाला अभिमान वाटेल; कारण एखाद्या गरीब घरातून शिक्षण घेऊन मुलीने इतके मोठे यश संपादन करणे, हे वैशिष्ट्यपूर्णच आहे. अर्थात् त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेच लागतात. अंकिताही गेल्या ३ वर्षांपासून दिवाणी न्यायाधीशपदासाठी सिद्धता करत होती. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आणि कौटुंबिक परिस्थितीला पूर्णपणे स्वीकारून अंकिताने न्यायाधीशपद मिळवले आहे. तिचे आई-वडील हातगाडीवर भाजी विकतात, तर भाऊ वाळूच्या बाजारात मजुरीचे काम करतो. वेळप्रसंगी अंकितानेही आई-वडिलांना भाजी विकण्यास साहाय्य केले आहे. अंकिताच्या महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी तिच्या वडिलांना कर्ज काढावे लागायचे. त्याही स्थितीत तिने अभ्यासात कधीच खंड पडू दिला नाही. अंकिताचे घर लहान आहे. त्यामुळे उन्हाळ्यात छतावरील पत्रे पुष्कळ तापायचे. तर पावसाळ्यात छतावरून पाणी गळायचे. भावाने स्वतःच्या मजुरीतून काही पैसे वाचवले आणि अंकितासाठी शीतयंत्र (कूलर) आणले. दोनदा न्यायाधीशपदासाठी तिची निवड झाली नाही; पण तिने पराभूत न होता अभ्यासात सातत्य ठेवल्याने तिला तिसर्यांदा परीक्षेत घवघवीत यश मिळाले. अशा प्रकारे अंकिताने शैक्षणिक वाटचाल चालू ठेवली आणि तिच्या कुटुंबियांनी यात तिला मोलाची साथ दिली. यातून ‘तिचे न्यायाधीशपदाचे स्वप्न साकार झाले’, असे म्हणता येईल !
प्रेरणादायी उदाहरणे !
अंकिता नागर यांच्यासारखे अनेक तरुण-तरुणी भारतात आहेत. अनेकांची यशोगाथा उज्ज्वल आहेच. अंकिताप्रमाणे काही जणांच्या घरी आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतातच, असे नाही. ज्यांच्याकडे विजेची अनुपलब्धता असते, ते त्याच अल्प प्रकाशात अभ्यास करतात. ‘वीज नाही, तर अभ्यास कसा करणार ?’, असे रडगाणे कधीच गात नाहीत. त्यामुळे त्यांना मोठे यश मिळून त्यांचे आयुष्य खरोखरच उजळून निघते. स्वातंत्र्यपूर्वकाळातही अनेकांनी रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशात अभ्यास केला होता. काही जण तर रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करायचे. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी अशाच कठीण परिस्थितीत अभ्यास करून यश संपादन केले होते. अशा थोरामोठ्यांचा आदर्श आपण समोर ठेवायला हवा. त्यांनी प्रतिकूल काळात हे साध्य करून दाखवले, मग सगळीकडे लखलखाट असतांनाही आजच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे का जमत नाही ? याचा त्यांनी विचार करावा ! सध्या पैशांअभावी काही जणांना मोलमजुरी करून रात्रशाळेत प्रवेश घ्यावा लागतो. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असे करूनही अनेक विद्यार्थ्यांनी आपापले शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल केले आहे. काही विद्यार्थ्यांना तर शिक्षण घेण्याची पुष्कळ इच्छा असते; पण आपल्या लहान भावंडांचे दायित्व असल्याने त्यांच्या शिक्षणासाठी कुठेतरी कामे करून पै न पै साठवावी लागते. पदरमोड करावी लागते. स्वतःची इच्छा मारून जगावे लागते. आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला संघर्ष चुकलेला नाही. संघर्ष करत करतच जीवनाचे शिल्प प्रत्येकाला घडवावे लागते, हे सत्य आहे. संघर्षाला बाजूला सारून कधीच यश मिळत नसते. संघर्ष करूनच विजयश्री खेचून आणावी लागते. अंकिताने तेच केले ! म्हणूनच ती सर्वांसाठी आदर्श ठरली.
परिस्थितीचा सामना करा !
सर्व काही ‘आयते’ (रेडिमेड) मिळत असलेल्या सध्याच्या जगात ‘संघर्ष’, ‘प्रगती’, ‘लढणे’ या गोष्टी बहुतांश तरुणाईला कठीण वाटतात. ‘संघर्ष न करता मला यश सहजसाध्य व्हायला हवे’, अशी त्यांची मानसिकता असते. शरीर झिजवणे किंवा मानसिक ओढाताण झाली, तरीही त्यातून वाट काढणे हे त्यांना रुचतच नाही. ‘आयुष्य म्हणजे प्रतिकूल स्थितीत लढण्याचे रणांगण असते’, हे या तरुणांना कधी समजणार ? ‘आपल्यावर राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे’, हे त्यांनी जाणले पाहिजे.
‘भाजीविक्रेती ते न्यायाधीश’ हा अंकिता यांचा प्रवास खडतरच होता; पण ‘प्रतिकूल परिस्थितीने त्यांना शहाणपण शिकवल्याने त्या शिक्षणात उत्तम कामगिरी बजावू शकल्या’, असे म्हणता येईल. कष्टातून वर येऊन यशस्वी वाटचाल करणारी व्यक्ती भविष्यातील निर्णयही सखोल आणि अभ्यासपूर्ण घेऊ शकते. त्यामुळे ‘अंकिताकडून न्यायाधीशपदी असतांना सर्वसमावेशक आणि जनहितकारी निर्णय घेतले जातील’, अशी आशा बाळगूया. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अमरावती येथील अक्षय गडलिंग हा तरुण यशस्वी झाला होता. त्यानंतर पुढे ते नायब तहसीलदारही झाले. ते झोपडीत रहायचे. त्याच्या वडिलांचा भंगारविक्रीचा व्यवसाय होता; पण ही स्थिती त्याने यशाच्या आड कधीच येऊ दिली नाही. त्यामुळेच ते गुणवंत ठरले ! आजची तरुणाई म्हणजे खरोखर अणूशक्तीच आहे. प्राप्त प्रतिकूल स्थितीचे कोणतेही भांडवल न करता मार्गक्रमण करत राहिल्यास विजयाला निश्चितच गवसणी घालता येते. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, ध्येय आणि संघर्षाची सिद्धता यांच्या बळावर आपणच आपली यशोगाथा निर्माण करू शकतो, हे लक्षात ठेवायला हवे. अशा प्रकारे यशस्वी झालेली युवाशक्तीच राष्ट्रोद्धाराचे कार्य यथोचितपणे पार पाडू शकते. राष्ट्राचा विकास आणि उभारणी यांसाठी या शक्तीची आज खर्या अर्थाने आवश्यकता आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने राष्ट्रकर्तव्याची जाणीव ठेवून मार्गक्रमण केल्यास राष्ट्रोत्कर्ष साधला जाईल !