आस्थापनाच्या अधिकार्यांसह कारखान्याच्या कंत्राटदाराच्या विरोधात वेर्णा पोलिसांकडून गुन्हा नोंद
झुआरी अॅग्रो केमिकल्स कारखान्यातील दुर्घटना
पणजी, ५ मे (वार्ता.) – झुआरीनगर येथील झुआरी अॅग्रो केमिकल्स कारखान्यात ३ मे या दिवशी टाकीचा स्फोट होऊन ३ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी आस्थापनाने नेमलेल्या कंत्राटदाराच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा (‘एफ्.आय.आर्.’) नोंदवला आहे, तसेच तसेच प्लांट व्यवस्थापक, सुरक्षा व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी आणि सूपरवायझर यांना कह्यात घेतले आहे.
तत्पूर्वी वेर्णा पोलिसांनी ४ मे या दिवशी आस्थापन आणि ‘बोकारो इंड्रस्ट्रीयल वर्क्स’ हा कंत्राटदार यांचे संबंधित अधिकारी, तसेच घटनास्थळावरील उत्तरदायी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम ३३६ आणि ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Three labourers die in blast at Zuari Agro Chemicals factory in Goahttps://t.co/ZJL8t0q0bx
— The Indian Express (@IndianExpress) May 3, 2022
कंत्राटदार आणि आस्थापन यांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली ! – निळकंठ हळर्णकर, कारखाना आणि बाष्पक मंत्री
झुआरी अॅग्रो केमिकल्स आस्थापनातील स्फोट प्रकरणाला संबंधित कंत्राटदार आणि आस्थापनाचे व्यवस्थापन यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखाना आणि बाष्पक मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘कारखान्यातील युरिया प्लांटमधील ‘कंडेन्सेट’ टाकीवर गॅस कटिंग तंत्रज्ञानाचा वापर करणे अपेक्षित नव्हते. तसेच काम चालू असतांना त्या ठिकाणी आस्थापनाचा अभियंता आणि ‘सुपरवायझर’ असण्याची आवश्यकता होती; मात्र ते तेथे उपलब्ध नव्हते.’’