राणा दांपत्याची जामिनावर सुटका !
मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांची १२ दिवसांनंतर ५ मे या दिवशी कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना होणाऱ्या मानेच्या त्रासामुळे त्या लीलावती रुग्णालयात भरती झाल्या आहेत.
न्यायालयाने राणा दांपत्याची अटक अनधिकृत ठरवली. ‘अटकेपूर्वी त्यांना नोटीस देणे आवश्यक होते. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली’, हा राणा यांच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने राणा दांपत्याला जामीन संमत केला. त्यांची ४ मे या दिवशी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात जामीन संमत करण्यात आला; मात्र कार्यालयीन कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्यांची सुटका होऊ शकली नव्हती. नवनीत राणा यांना भायखळा, तर रवि राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी जाणाऱ्या राणा दांपत्याला पोलिसांनी कह्यात घेतले होते.