गडचिरोली येथील जंगल परिसरात वाघाच्या आक्रमणात तरुणाचा मृत्यू !
प्रियकर तरुणीचे घाबरून पलायन
गडचिरोली – जंगल परिसरात दुचाकीवरून फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर वाघाने ३ मे या दिवशी आक्रमण केले. यात २१ वर्षीय प्रियकर तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून प्रियकर तरुणी तेथून पळून गेली. १-२ घंटे शोध घेतल्यावर तरुणाचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला. दुचाकीवरून फिरणाऱ्या प्रेमीयुगुलावर वाघाने आक्रमण केले.
या वेळी वाघाने तरुणाला जंगल परिसरात ओढत नेले. त्याच वेळी प्रेयसीने तेथून पळून जात घटनेविषयी गावकऱ्यांना सांगितले. या घटनेनंतर ‘नागरिकांनी जंगल परिसरात फिरू नये’, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. (हिंस्र पशू असणाऱ्या जंगलात न फिरण्याविषयी वनविभागाने नागरिकांनी आधीच सतर्क का केले नाही ? किंवा त्यासंदर्भातील सूचना का लावलेली नाही ? एकाचा मृत्यू झाल्यावर असे आवाहन करून काय उपयोग ? – संपादक)