श्रीलंकेच्या विध्वंसाची कारणे : कोविड, रासायनिक खते आणि चीनचे कर्ज !
श्रीलंकेमधील सर्व समस्या या जैविक शेतीमुळे चालू झाल्या आहेत’, असा अपसमज जागतिक स्तरावर आणि माध्यमांमध्ये निर्माण झाला आहे. यासंदर्भात वास्तव जाणून घेण्यासाठी ‘वायर’ संकेतस्थळाच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध पर्यावरणवादी वंदना शिवा यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी श्रीलंकेच्या अधःपतनाला जैविक शेती नाही, तर कोविड, रासायनिक खते आणि कर्ज कारणीभूत असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.
१. चीनकडून दळणवळण सुविधांसाठी कर्ज घेतले; पण ते फेडता न आल्याने श्रीलंका कर्जामध्ये बुडणे
श्रीलंकेत मोठमोठे महामार्ग, बंदरे, वीज प्रकल्प, विमान तळ बनवण्यात आले. त्यासाठी चीनकडून प्रचंड आर्थिक साहाय्य आणि कंत्राटदारही पाठवण्यात येत होते. तेथून श्रीलंका कर्जामध्ये बुडत गेल्याने तो त्याची परतफेड करू शकत नव्हता. त्यामुळे अर्थात्च तेथील सर्व बंदरे, तसेच मोठमोठे प्रकल्प चीनचे झाले. श्रीलंका कर्जाच्या जंजाळामध्ये गटांगळ्या खात होता.
त्याच वेळी वर्ष २०२० मध्ये जगावर कोरोना संक्रमणाचे सावट आले. त्यामुळे श्रीलंकेचे ३ मोठे आर्थिक मिळकतीचे स्रोत बंद झाले. श्रीलंकेला पर्यटनातून मिळणारी प्रचंड मिळकत ५० टक्क्यांनी खाली आली. कोरोनाच्या काळात सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने निर्यात बंद झाली. त्यामुळे श्रीलंकेची मसाले, चहा, कॉफी, रबर आदी वस्तूंची निर्यांत थांबली. मुख्य निर्यात क्षेत्र कोलमडून पडले. कर्जाची परतफेड करणे, हा प्रश्न आधीच गंभीर होता. त्यानंतर वर्ष २०२१ मध्ये श्रीलंकेने खतांच्या आयातीवर ३०० मिलियन डॉलर्स व्यय करण्याचे ठरवले; परंतु त्यांच्या नेत्यांनी तसे करण्याला विरोध केला. त्याऐवजी जैविक शेती करण्याचा निर्णय घेण्यात आला; पण त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, तसे कोणतेही प्रयत्न श्रीलंकेने केले नाहीत. बाहेरून रासायनिक खतांची आयात थांबली; पण त्याच वेळी ती चीनमधून चालू झाली, जी अर्थात्च जंतू संसर्ग झालेली होती.
२. कीटकनाशकांमुळे श्रीलंकेच्या सहस्रो लोकांची मूत्रपिंडे निकामी होणे
इंग्रजांच्या काळात श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात चहा, कॉफी आणि रबर यांचे मळे लावण्यात आले. त्यावर कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात मारा करण्यात आला. परिणामी जैविकता नष्ट झाली. या कीटकनाशकांमुळे श्रीलंकेच्या सहस्रो लोकांची मूत्रपिंडे निकामी झाली.
३. रासायनिक शेतीमुळे श्रीलंकाच नाही, तर पंजाबचा शेतकरीही उद्ध्वस्त होणे
आपल्याला रासायनिक शेतीमुळे झालेले परिणाम पहाण्यासाठी श्रीलंकेकडे पहायची आवश्यकता नाही. ते आपल्याच देशातील पंजाबकडे पाहून समजते. तेथील पाणी संपले आणि पंजाबी शेतकरी कर्जामध्ये बुडाला आहे. सध्याच्या घडीला श्रीलंकेला साहाय्याची आवश्यकता आहे. हरित क्रांतीच्या नावाने ज्या लोकांनी रासायनिक खते (फर्टिलायझर) विकून पंजाबला संपवले, ते आता हरित क्रांतीच्या माध्यमातून आफ्रिका उद्ध्वस्त करायच्या मागे लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून खरे बोलण्याची अपेक्षा करू शकत नाही. काहीही गडबड झाली, तरी ते ‘हे जैविक शेतीमुळे झाले आहे’, असेच म्हणतील. ते त्यांचे हे विष अधिक प्रमाणात वापरण्यासाठी जगासमोर ‘प्रमोट’ (प्रोत्साहन) करतील.
४. जैविक शेतीविषयी क्युबाने जगासमोर एक चांगले उदाहरण ठेवणे
श्रीलंकेत जैविक शेती हा एक प्रयोग होता आणि त्याची कार्यवाही कधी झालीच नाही. जैविक शेती हा उपयुक्त काळात वाईट विचार होऊ शकत नाही; पण त्याला अचानकपणे स्वीकारल्याने राष्ट्रीय स्तरावरील धान्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. आपल्याला खरच जैविक काय करते, हे पहायचे असेल, तर त्यासाठी क्युबा हे सर्वांत चांगले उदाहरण आहे. सोव्हिएत संघ कोलमडल्यावर क्युबाची तेल आणि खते यांची आयात बंद झाली. तेव्हा ‘तेल, टॅ्रक्टर आणि खते यांच्याविना आपण शेती कशी करणार ?’, असा प्रश्न क्युबाची वैज्ञानिक संस्था आणि सरकार यांना पडला. नंतर त्यांनी संपूर्ण बेटच जैविक शेतीकडे वळवले. त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि जैविक शेतीच्या संदर्भात एक चांगले उदाहरण जगासमोर ठेवले.