मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी सचिन वाझे यांनी प्रदीप शर्मा यांना दिले ४५ लाख रुपये !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा प्रतिज्ञापत्रात गंभीर आरोप !
मुंबई – माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हेच मनसुख हिरेन यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार आहेत. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी सचिन वाझे यांनी प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिले, असा गंभीर आरोप राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रतिज्ञापत्रात केला आहे. ४ मे या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. १७ जुलै या दिवशी यावर सुनावणी होणार आहे.
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत रचण्यात आला. तेथे प्रदीप शर्मा यांसह अन्य आरोपी उपस्थित होते, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. २५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या जवळ स्फोटासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या असलेली चारचाकी सापडली होती. काही दिवसांनी त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली.