संभाजीनगर येथे देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा घालणाऱ्या मुख्य गुन्हेगाराला अटक !
संभाजीनगर – २१ एप्रिलच्या रात्री १ वाजता पोटूळ रेल्वेस्थानकावर सिग्नलची वायर कापून देवगिरी एक्सप्रेसवर ७ – ८ जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता. येथे एकाच मासात रेल्वेवर तिसरा दरोडा पडला होता. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी अन्वेषण करत दरोडेखोरांचा म्होरक्या शिवानंद काळे याला ४ मे या दिवशी अटक केली आहे. शिवानंद हा कुख्यात गुन्हेगार असून गुजरातमध्ये पोलिसाचा खून केल्याने तो ८ वर्षे कारागृहात होता. २० एप्रिल या दिवशी कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्याचे ४ जिल्ह्यांतील नातेवाईक आणि मित्र एकत्र आले. तेथे त्यांनी पोटूळ येथे दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. आरोपी काळे याच्यावर २५ हून अधिक गुन्हे नोंद आहेत.