नगर जिल्ह्यात २ सहस्र अनधिकृत भोंगे !
नगर येथील अजान भोंग्याविना !
नगर – मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घोषित केलेल्या आंदोलनानंतर नगर शहरात ४ मे या दिवशी पहाटे मशिदीवरील भोंगे बंद ठेवून अजान देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध धर्मिंयांची अनुमाने ४ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळे आहेत. त्यातील २ सहस्र धार्मिक स्थळांवर भोंगे बसवण्यात आले आहेत; मात्र कुणीही अनुमती घेतलेली नाही. आता जिल्ह्यात भोंग्यांसाठी अनुमती मागणारे १५० अर्ज आले आहेत. त्यातील ६ अर्जांना अनुमती देण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ९५० समाजकंटकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शिर्डीतील सर्व ६ मशिदींमध्ये भोंग्यांसाठी पोलिसांकडे अनुमती घेण्यात आल्याचे शिर्डी शहर जामा मशीद ट्रस्टचे सचिव बाबाभाई सय्यद यांनी सांगितले.
श्रीरामपूरमध्ये २८ मनसे कार्यकर्त्यांना अटक !
श्रीरामपूरमधील सय्यदबाबा चौकातील मशिदीसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करणार्या मनसे कार्यकर्त्यांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. मनसेचे पदाधिकारी बाबा शिंदे यांच्यासह २७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.