इस्रो शुक्र ग्रहावर लवकरच यान पाठवणार !
नवी देहली – चंद्र आणि मंगळ यांवर यान पाठवल्यानंतर आता सौर मालिकेतील सर्वांत उष्ण ग्रह असलेल्या शुक्र ग्रहावर अंतराळयान पाठवण्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ सिद्धता करत आहे. शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय दडले आहे, याचा शोध घेण्यासाठी त्याच्या कक्षेत भ्रमण करणे आवश्यक आहे. शुक्राला वेढून असलेल्या गंधकयुक्त आम्लयुक्त (सल्फ्युरिक अॅसिड) ढगांखालील रहस्यांचा शोध घेणे, हाही या मोहिमेचा उद्देश आहे.
शुक्र मोहिमेसंदर्भात विचार झाला आहे, तिचा प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात आला आहे आणि तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी सांगितले.
Isro chairman S Somnath has said that the capability of building and launching a mission to Venus exists with India.https://t.co/BJFiZGWXL7
— IndiaToday (@IndiaToday) May 4, 2022
डिसेंबर २०२४ मध्ये मोहीम पूर्ण करण्याचे ध्येय !
एस्. सोमनाथ पुढे म्हणाले की, ही मोहीम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणे आणि त्यानंतरच्या वर्षांत अंतराळ यान शुक्राच्या कक्षेत फिरत ठेवणे, असे लक्ष्य ठेवण्याचा आम्ही विचार केला आहे. या वर्षांत पृथ्वी आणि शुक्र यांची स्थिती अशी राहणार आहे की, प्रणोदकाचा (‘प्रॉपेलंट’चा) कमीत कमी वापर करून यान शुक्राच्या कक्षेत ठेवणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची स्थिती त्यानंतर वर्ष २०३१ मध्येच निर्माण होऊ शकेल.