सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील खाणींमध्ये पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली
सावंतवाडी, ४ मे (वार्ता.) – सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील खाणींमध्ये पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली करून अनुमतीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन होत आहे. तसेच त्या खनिजाची क्षमतेपेक्षा अधिक( ओव्हरलोड ) वाहतूक होत असल्याने शासनाने घालून दिलेले निर्बंध मोडले जात आहेत. तसेच योग्य कर (रॉयल्टी) भरला जात नसल्याने शासनाची आर्थिक हानी होत आहे. संबंधितांवर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढील ८ दिवसांत संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी राजन तेली यांनी निवेदनातून दिली आहे. या वेळी कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याला प्रशासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी दिली आहे. या वेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महेश सारंग, महेश धुरी, गजानन पालेकर, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, सत्यवान बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.