अग्नीशमन यंत्रणा सुरळीत चालू असल्याचा अहवाल आता ‘ऑनलाईन’ !

मुंबई – मुंबईत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रत्येकी सहा मासांनी अग्नीशमन लेखा परीक्षण अहवाल (फायर ऑडिट रिपोर्ट) ‘ऑफलाईन’ सादर करावा लागत होता. आता यापुढे हा अहवाल ‘ऑनलाईन’ सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. यासाठी आता पालिकेने ‘बिल्डिंग इन्स्पेक्शन सॉफ्टवेअर’ चालू केले आहे. या ॲपमध्ये ‘फायर सेफ्टी ॲक्ट २००६’च्या तरतुदीनुसार रहिवाशांना आवश्यक नियम, अटी आणि उपाययोजना यांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या अग्नीशमनदलाला कार्यवाही करणे आणि ‘ऑनलाईन’ नोटीस देणे शक्य होणार आहे. रहिवाशांनाही आपल्या इमारतीत अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचा ‘बी’ फॉर्म सादर करता येणार आहे.

सद्यस्थितीत मुंबईत ३ लाख इमारती आहेत. इतर आस्थापने मिळून ४० लाखांच्या वर मालमत्ता आहेत. सर्व ठिकाणी अग्नीशमन परीक्षणासाठी पोचणे पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येकी सहा मासांनी संबंधित इमारतीतील अग्नीशमन यंत्रणा सुरळीत चालू असल्याची निश्चिती करून त्याचा अहवाल अग्नीशमनदलाच्या ‘सॉफ्टवेअर’वर सादर करावा लागणार आहे.