रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ
गृह, वाहन कर्ज महागणार
नवी देहली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (‘आर्.बी.आय’ने) रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली असल्याची माहिती बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. २ आणि ३ मे या दिवशी ‘आर्.बी.आय’च्या पतधोरण समितीच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे आता नवा रेपो दर ४.४० टक्के इतका आहे. ही वाढ वस्तू (कमॉडिटीज्) आणि वित्तीय बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे करण्यात आली असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. या वाढीमुळे गृह आणि वाहन कर्ज महागणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
रेपो रेट वाढला, तुमचा घराचा हप्ता वाढणार https://t.co/v9XTTE9cMC
— Lokshahi News (@news_lokshahi) May 4, 2022
‘रेपो रेट’ (रेपो दर) म्हणजे काय ?
ज्या दराने बँकांना ‘आर्.बी.आय’च्या वतीने कर्ज दिले जाते, त्याला ‘रेपो रेट’ असे म्हटले जाते, तर बँकांनी त्यांच्याकडील पैसे ‘आर्.बी.आय’कडे ठेवले, तर त्या बँकांना रिझर्व्ह बँक जे व्याज देते, त्याला ‘रिव्हर्स रेपो रेट’ असे म्हटले जाते.