नाशिक येथे ३९ मशिदींना अजानसाठी अनुमती नाकारली !

  • मनसेच्या १४ जणांना तडीपारच्या नोटिसा

  • २९ जण कह्यात !

नाशिक – राज्यात बहुतांश धार्मिक स्थळांना भोंगे वाजवण्याची अनुमती नसल्याने नाशिक येथे या संदर्भात मशिदी आणि मंदिर यांच्याकडून अनुमतीसाठी ६० अर्ज आले आहेत. त्यांची छाननी करण्यात आली. त्यातील ३९ अर्जांमध्ये पहाटे ५ वाजल्यापासून अजानची अनुमती मागण्यात आली होती; मात्र पोलिसांनी हे अर्ज बाद केले. पोलिसांनी काही अर्जांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची अनुमती नसल्याने या त्रुटींची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे.

मशिदींसमोर हनुमान चालिसाच्या पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या वेळी मनसेचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. १४ मनसैनिकांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली, तर हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २९ मनसैनिकांना कह्यात घेण्यात आले आहे. मनसेचे २०० आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.