ब्राह्मण समाजाला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
अमरावती – येथील भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी ब्राह्मण समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर ३ मे या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ‘परशुराम जन्मोत्सव समिती’च्या अध्यक्ष चेतन पुरोहित यांनी त्यांच्या विरोधात अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
चेतन पुरोहित यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २ मे या दिवशी दुपारी ३ वाजता सूर्यकमल उपाहारगृहात निवेदिता चौधरी या भाजपच्या कार्यकर्त्यांसमवेत बसल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या समोरून भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी जात होते. निवेदिता चौधरी यांनी माझ्याकडे पाहून अश्लील शब्दांत शिवीगाळ केली. ‘ब्राह्मण गद्दार असतात’, असे त्या म्हणाल्या. त्यांनी ब्राह्मण जातीविषयी द्वेष पसरवणारे वक्तव्य केले. अवमानास्पद शब्दांमुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.