छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णाेद्धारात लोकमान्य टिळक यांचा होता पुढाकार !
‘शिवतीर्थ रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही लोकमान्य टिळक यांनी बांधली’, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाजीनगर येथे १ मे या दिवशी झालेल्या सभेत केले होते. यानंतर काही ब्राह्मणद्वेषी आणि जात्यंध संघटनांनी सत्याचा विपर्यास करत चुकीची मांडणी करण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे नेमका खरा इतिहास काय आहे ? ते येथे देत आहोत.
१. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या स्थापनेचा उद्देश
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने वर्ष १८९५ मध्ये झाली. ही स्थापना प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केली गेली. त्यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची आणि इतर वास्तूंची देखभाल, दुरुस्ती अन् जीर्णोद्धार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम, शिवचरित्राचा प्रचार अन् प्रसार करणे.
सध्या या मंडळाचे अध्यक्ष श्री. रघोजीराजे आंग्रे (सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज), उपाध्यक्ष डॉ. दीपक टिळक (लोकमान्य टिळक यांचे नातू), तर सरकार्यवाह ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे (नरवीर नावजी बलकवडे यांचे वंशज) आहेत.
२. समाधीच्या दुरवस्थेविषयी कळल्यावर तिचा जीर्णोद्धार करण्याविषयी एका सभेत ठरणे
वर्ष १८१८ मध्ये मराठेशाहीचा अस्त झाला आणि रायगडही ब्रिटिशांच्या कह्यात गेला. ब्रिटिशांनी सर्वच गडांवर जायला बंदी आणली. या काळात रायगड पूर्णतः दुर्लक्षित होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था झाली होती. वर्ष १८८३ मध्ये जेम्स डग्लस नावाचा इंग्रज गृहस्थ शिवचरित्र वाचून महाराजांच्या जिज्ञासेपोटी गडावर गेला. रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी त्याने लिहून ठेवले. डग्लसचे हे वर्णन वाचून त्या वेळच्या भारतीय समाजात अस्वस्थता पसरली. यानंतर वर्ष १८८५ मध्ये रावबहाद्दूर जोशी, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती कुंटे इत्यादी समाजधुरिणांनी पुण्ो येथे एका सभेचे आयोजन केले आणि त्यात समाधी जीर्णोद्धाराच्या कार्याचे सूतोवाच करण्यात आले.
३. पुणे येथे आयोजित सभेत जीर्णोद्धाराच्या निधीसाठी आवाहन केले जाणे आणि मंडळाची स्थापना केली जाणे
३० मे १८९५ या दिवशी लोकमान्य टिळक यांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा मोठ्या सभेचे आयोजन केले. या सभेला श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सेनापती दाभाडे, लोकमान्य टिळक, बापूसाहेब कुरुंदवाडकर, सरदार पोतनीस, अनेक संस्थानिक, सरदार आणि पुण्यातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. या सभेत रायगडावरील महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले.
त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली आणि तेच हे ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ ! लोकमान्य टिळक यांनी दैनिक ‘केसरी’तून फंड (निधी) उभारणीचे आवाहन केले. ज्युनिअर कुरुंदवाडाचे प्रमुख श्रीमंत बापूसाहेब पटवर्धन यांनी समाधीवर छत्री बांधण्याचा, नित्य पूजा करण्याचा आणि प्रतिवर्षी रायगडावर उत्सव चालू करण्याचा ठराव मांडला. श्री. दाजी आबाजी खरे यांची अध्यक्ष म्हणून आणि लोकमान्य टिळक यांची कोषाध्यक्ष अन् चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत २४ अन् २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
४. समाधी जीर्णोद्धारासाठी ब्रिटीश सरकारकडे केलेला संघर्ष यशस्वी होणे आणि वास्तू उभी रहाणे
रायगडाचा ताबा ब्रिटीश सरकारकडे असल्याने मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची अनुमती मागण्यात आली; पण ती त्यांनी नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. त्या वेळचे मंडळाचे अध्यक्ष दाजी आबाजी खरे यांनी वर्ष १९०६ मध्ये ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड यांचेकडे एक अर्ज प्रविष्ट केला. त्यात सुनावले, ‘शिवाजीराजांच्या प्रती आम्हा सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल, अशी स्मारकाची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे.’
पुढे तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळक यांच्या हयातीनंतर रायगड स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना समाधी जीर्णोद्धारात यश आले. ६ फेब्रुवारी १९२५ या दिवशी ब्रिटीश सरकारने १९ सहस्र ४३ रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. यापैकी मंडळाने उभा केलेला १२ सहस्र रुपयांचा फंड, ब्रिटीश सरकारचे ५ सहस्र रुपये आणि पुरातत्व विभागाच्या पश्चिम प्रभागाच्या पर्यवेक्षकांनी २ सहस्र ४०३ रुपयांचा निधी देण्याचे ठरवले. रत्नागिरीच्या ‘पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट’च्या वतीने आणि रायगड मंडळाच्या देखरेखीने आराखडा सिद्ध करून कामाला प्रारंभ झाला. त्याच्या पुढच्याच म्हणजेच वर्ष १९२६ मध्ये आज आपण पहातो ती छत्रपती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी राहिली. यासंबंधीचा ब्रिटिशकालीन कागदोपत्री पुरावा आजही श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे उपलब्ध आहे.
(साभार – ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’चे संकेतस्थळ)