लोकमान्य टिळकांचे रायगडावरील शिवरायांच्या समाधीस्थळाच्या निर्मितीत निश्चित योगदान आहे ! – ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे
पुणे, ३ मे (वार्ता.) – वर्ष १८८३ ला जेम्स डग्लस नावाच्या इतिहासप्रेमी इंग्रजाने त्याच्या ‘बूक ऑफ बॉम्बे’ या पुस्तकात शिवरायांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी लिहले होते. हा विषय सर्व मराठीजनांपर्यंत पोचल्यानंतर त्याच्या परिणामस्वरूप पुण्यात वर्ष १८८५ मध्ये हिराबाग येथे लोकमान्य टिळकांनी सभा घेतली. त्यानंतर ३० मे १८९५ मध्ये आणखी एक पाठपुरावा सभा झाल्यानंतर वर्ष १८९५ मध्ये लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा’ची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून रायगडावरील शिवसमाधीचा जिर्णाेद्धार करण्यात आला. या कालावधीत झालेल्या अनेक घडामोडींवरून पुराव्यानिशी असे स्पष्ट होते की, लोकमान्य टिळकांचे रायगडावरील शिवरायांच्या समाधीस्थळाच्या निर्मितीत निश्चित योगदान आहे, असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी केले. पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, माजी अध्यक्ष जगदीश कदम, लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक हे उपस्थित होते. या वेळी सर्वांनी लोकमान्य टिळकांवर झालेल्या टीकेचा निषेध केला.
‘महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधली का ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना ‘असंबद्ध न बोलता त्यासंबंधी पुरावे उपलब्ध असतील, तर ते पुरावे समाज आणि प्रसारमाध्यमांसमोर आणावेत’, असे आवाहन पांडुरंग बलकवडे यांनी केले.
लोकमान्य टिळक यांचा अवमान करणार्यांचा जाहीर निषेध ! – रघुजीराजे आंग्रे
स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचणारे लोकमान्य टिळक यांच्यासारख्या क्रांतीकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने छत्रपती शिवरायांच्या समाधी स्मारकासाठी कोणतेच सहकार्य केले नाही, याउलट विरोधच केला होता. तरीही प्राप्त परिस्थितीत शक्य तितके मार्ग अवलंबून लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधी स्मारकासाठी पाठपुरावा केला आणि त्यांचेच स्वप्न साकार करत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने आता मेघडंबरीत असलेल्या समाधीची निर्मिती केली. अशा लोकमान्य टिळकांचा अवमान करणार्यांचा मी जाहीर निषेध करतो.
लोकमान्य टिळक यांच्यावर जातीय द्वेषातून आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे अतिशय दुर्दैवी ! – कुणाल टिळक
लोकमान्य टिळकांनी रायगडायवरील समाधीच्या जिर्णाेद्धाराचा पाया रचला. याचे पुरावे सादर करण्याची विनंती मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांना केली होती. त्याप्रमाणे त्यांनी सर्व पुरावे आपल्याला दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांसारख्या व्यक्तींनी राजकीय लाभ घेण्यासाठी ‘लोकमान्य टिळक यांनी शिवरायांच्या समाधीची एकही वीट रचली नाही’ अशा पद्धतीची वक्तव्ये केली. लोकमान्य टिळक यांच्यावर जातीय द्वेषातून आरोप करून त्यांचे श्रेय नाकारणे अतिशय दुर्दैवी आहे.
शिवरायांच्या विचारांचा प्रसार, प्रचार हेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्य ! – जगदीश कदम
आतापर्यंत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या व्यासपिठावर अनेक राज्यकर्ते येऊन गेले आहेत. प्रत्यक्ष इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा पंतप्रधान असतांना शिवरायांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास आले आहेत. लोकमान्य टिळक यांची स्मारकाविषयीची कल्पना आज रायगडावर साकार झालेली आपल्याला दिसत आहे. शिवरायांच्या विचारांचा प्रसार, प्रचार हेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्य आहे.