५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पिंपळगाव बसवंत, नाशिक येथील चि. क्रिशव मोहित राठी (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. क्रिशव मोहित राठी हा या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तऱ्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. क्रिशव मोहित राठी याची त्याची आई आणि काकू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
(क्रिशव : श्रीकृष्ण आणि शिव या देवतांच्या नावांची संधी)
१. गर्भारपण
अ. मी रामरक्षास्तोत्र आणि देवीकवच म्हटल्यावर मला गर्भातील बाळाची हालचाल जाणवायची.
आ. मी गर्भातील बाळाशी नेहमी बोलत असे.
इ. मला नेहमी सात्त्विक पदार्थ खाण्याची इच्छा व्हायची.
ई. गर्भारपणाच्या आधी मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्यास माझी चिडचिड होत असे; मात्र गर्भारपणात माझी चिडचिड न होता, मी एखादी गोष्ट सहजतेने सोडून देत असे.
२. जन्म ते ५ मास
२ अ. शांत : माझी प्रसूती होऊन मला मुलगा झाला. तेव्हा रुग्णालयातील परिचारिका आणि आधुनिक वैद्य म्हणायचे, ‘‘तुमचे बाळ किती शांत आहे ! तुम्ही फार भाग्यवान आहात. बहुतेक बाळे जन्म झाल्यावर पुष्कळ रडतात. आईला जराही विश्रांती घेऊ देत नाहीत.’’ त्यांचे बोलणे ऐकून मी भारावून जात असे.
२ आ. देवाची ओढ : माझ्या चुलत सासूबाईंच्या घरी श्रीकृष्णाचे मोठे चित्र आहे. क्रिशव त्या चित्राकडे एकटक बघत असे. तेव्हा ‘ते दोघे बोलत आहेत’, असे मला वाटत असे. त्याला ‘श्रीकृष्ण कुठे आहे ?’, असे विचारल्यास तो लगेच त्या चित्राकडे बोट दाखवत असे.
३. ५ मास ते १ वर्ष
३ अ. चांगली स्मरणशक्ती : त्याला एकदाच काही दाखवले किंवा शिकवले, तर तो ते लक्षात ठेवतो. तो ६ मासांचा झाल्यानंतर माझ्या आईला भेटला. तेव्हा त्याने माझ्या आईला लगेच ओळखले. (तो दोन मासांचा असल्यापासून मी आईशी ‘व्हिडिओ कॉल’वर बोलतांना तिला पहायचा.)
३ आ. कोणी मोठ्या आवाजात बोलत असेल किंवा जोरात ओरडत असेल, तर त्याला आवडत नाही.
३ इ. सहनशील : तो ८ मासांचा असतांना त्याला ‘न्यूमोनिया’ झाला होता. तेव्हा त्याला रुग्णालयात भरती केले होते. त्याला प्रतिदिन ४ वेळा ‘सलाईन’ द्यावे लागायचे; पण त्याने एकही दिवस औषध घेतांना किंवा ‘सलाईन’ लावतांना त्रास दिला नाही. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘दुसरे कोणी असते, तर पुष्कळ त्रास दिला असता.’’
३ ई. तो झोपेत अनेक वेळा हातांची मुद्रा करतो. तेव्हा ‘तो जपमाळ घेऊन नामजप करत आहे’, असे मला वाटते. त्या वेळी तो मध्येच हसतो.
३ उ. त्याला देवाजवळ बसायला, आरती करायला आणि घंटा वाजवायला फार आवडते. तो देवाजवळ शांतपणे बसतो.
४. क्रिशवचे स्वभावदोष
अ. ‘हट्टीपणा
आ. तो त्याची खेळणी कुणालाही देत नाही.’
– सौ. श्रुति मोहित राठी (क्रिशवची आई), पिंपळगाव बसवंत, नाशिक.
(धारिकेतील सर्व सूत्रांचा दिनांक (३१.१०.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |