अतिक्रमण मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्त देण्यास नकार !
पालिका आयुक्तांचा सुरक्षारक्षकही काढला
सोलापूर, ३ मे (वार्ता.) – महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस देणार नसल्याचे पत्र पोलीस आयुक्तालयाने महापालिकेला पाठवल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. पालिका आयुक्तांसाठी १ सुरक्षारक्षक देण्यात आलेला असतो; मात्र तोही सुरक्षारक्षक पोलीस आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे सध्या पालिका आयुक्तांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी पोलीस आयुक्तालयाकडून यापूर्वी १५ पोलिसांचे पथक बंदोबस्तासाठी दिले जात होते. काही कालावधीनंतर हे पथक ७ पोलिसांचे करण्यात आले. या पोलीस बंदोबस्ताची रक्कम महापालिकेकडून पोलीस आयुक्तालयाला वेळोवेळी जमा केली जाते; परंतु या रकमेवरून सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या वेळी आयुक्त म्हणाले, ‘‘अतिक्रमण हटवणे हे वाहतूक पोलिसांचेही दायित्व आहे; मात्र पोलीस संरक्षण दिलेले नसले तरीही अतिक्रमण हटवण्याची मोहीम चालूच राहील.’’
संपादकीय भूमिकाशहराच्या दृष्टीने सार्वजनिक हिताच्या उपक्रमास पोलीस संरक्षण नाकारणे अनाकलनीय आहे. असे करून पोलीस एकप्रकारे अतिक्रमणांना संरक्षणच देत आहेत, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ? |