संस्कारांचे बाजारीकरण नको !
हिंदु धर्मातील विवाह संस्कार म्हणजे व्यवहार, ध्येयनिष्ठा, सामाजिक विचार, वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उन्नयन अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाप आहे. विवाह सोहळ्यात विविध प्रकारचे विधी आणि प्रत्येक विधीचे विविध मंत्र आहेत. विवाहाच्या मंत्रांचा अर्थ नीट समजून घेतल्यास ‘अग्नि, देव आणि ब्राह्मण यांच्या साक्षीनेच विवाह व्हावा’, असे प्रत्येक तरुणीला वाटेल; मात्र सध्या ‘पैसे देऊन विवाह करून घरी आणलेल्या नवरीचा नवरदेवाच्या घरातून पोबारा’, अशा प्रकारची वृत्ते अनेक ठिकाणी पहायला आणि वाचनात येत आहेत. जळगाव येथे विवाह जमवण्यासाठी दीड लाख रुपये दिले आणि विवाहानंतर केवळ १३ दिवसांतच नवरी घरातून पळून गेली. यानंतर स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने नवरीसह विवाह जमवणाऱ्या चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे.
हिंदु धर्मामध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या विवाह संस्काराचे व्यवसायात रूपांतर होऊन अनेक लोक त्याद्वारे अर्थार्जन करत आहेत; मात्र त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. विदेशातील लोक भारतीय संस्कृतीचा आणि कुटुंबव्यवस्थेचे आचरण करत आहेत; मात्र फसवणुकींच्या प्रकारांमुळे भारतातील आदर्श समजली जाणारी कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे.
चांगली कुटुंबव्यवस्था म्हणजे सुसंस्कृत समाजाचे लक्षण असते. प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्री ही केंद्रस्थानी असते आणि तीच संपूर्ण कुटुंबाला योग्य पद्धतीने एकत्र बांधून ठेऊ शकते; परंतु नैतिक मूल्यांच्या अभावामुळे गतीमान युगात पालटणारी कुटुंबव्यवस्था सावरणे आवश्यक बनले आहे.
पूर्वीच्या काळी लहानपणापासूनच प्रत्येकाला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव करून दिली जात असे, तसेच धर्मशिक्षण दिले जात असे. त्यामुळे ‘पती धर्म’ आणि ‘पत्नी धर्म’ म्हणजे काय ? त्यांची कर्तव्ये कोणती ? यांची संज्ञा युवकांना स्पष्ट होती, त्यानुसार ते जीवनही जगत होते. सध्या मात्र धर्मशिक्षण न दिल्याने विवाह संस्कारासारख्या सुंदर संस्कारांचे बाजारीकरण होऊन अनेकांचे जीवन, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हे बाजारीकरण थांबवण्यासाठी आणि संभाव्य तोटे लक्षात घेऊन सरकारने आतातरी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, असे सामान्य जनतेला वाटते.
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर