गाळ काढलेल्या शिव नदीत नागरिकांकडून टाकला जात आहे पुन:पुन्हा कचरा
चिपळूण (रत्नागिरी) – प्रतिवर्षी पावसाळ्यात शहरात पूर येतो, या भीषण परिस्थितीवर उपाययोजना म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रवाहीत होणार्या शिव नदीतील कचरा आणि गाळ काढण्याचे काम ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शासनाने चालू केले आहे. त्यामुळे या नदीत ‘नागरिकांनी कचरा टाकू नये’, अशी विनंती नगर परिषद प्रशासन आणि चिपळूण बचाव समितीकडून वारंवार केली जात आहे. तरीही येथील नागरिकांकडून शिव नदीमध्ये टाकावू प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नदीत टाकल्या गेलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा खच शिव नदीपात्रात दिसून येत आहे.
सद्य:स्थितीत शिव नदीतील गाळ काढण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. नदीतील गाळ काढल्यामुळे नदीचे पात्र रुंद आणि खोल होत आहे. येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या, तसेच प्रशासनाकडून प्लास्टिक बाटल्या आणि कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीचे नियोजनही करण्यात आले, तरीही नागरिकांकडून नदीत कचरा टाकण्याची चुकीची कृती केली जात आहे.
संपादकीय भूमिकाअशा बेशिस्त आणि दायित्वशून्य नागरिकांना प्रशासनाने दंड ठोठवायला हवा ! |