चाफेकरबंधूंचे चरित्र आत्मसात केल्यास देश वाचेल !- ह.भ.प. चारुदत्त आफळे
संगमेश्वर (रत्नागिरी) – चाफेकरबंधूनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारून इंग्रजांवर जरब बसवली. त्यांच्या त्यागामुळे भारतियांचे प्राण वाचले. अशा चाफेकरबंधूंचे चरित्र आत्मसात केल्यास देश वाचेल, असे प्रतिपादन ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी केले. तालुक्यातील धामणी येथे ‘कलांगण’ने आयोजित केलेल्या कीर्तनात ते बोलत होते.
आख्यानात ह.भ.प. चारुदत्त आफळे म्हणाले, ‘‘१८९६ मध्ये महाराष्ट्रात प्लेगची साथ आली. या वेळी ‘जनतेची ब्रिटीश शासन काळजी घेत नाही’, हे समजल्यावर व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावर डांबर ओतून निषेध नोंदवण्यात आला होता. लोकमान्य टिळकांनी याविषयी अग्रलेख लिहून जागरुकता केली आणि वैद्यकीय फळी उभी केली; पण ती अपुरी ठरली.
या साथीच्या वेळी इंग्रज सरकारने अमानुष अत्याचार चालू केले. याचाच परिणाम दामोदर चाफेकरांनी‘ रँड’ या इंग्रज अधिकार्याचा वध केला. चाफेकरबंधूनी ‘आर्य धर्म प्रतिबंध निवारक समिती’ची स्थापना केली. त्याचमुळे अनेक हिंदूंना संरक्षण मिळाले. ‘एका व्यक्तीच्या वधासाठी एका कुटुंबातील ३ सख्खे चाफेकरबंधू देश रक्षणासाठी फासावर जातात’, हा त्याग आज शाळेत शिक्षकांनी शिकवायला हवा.’’