सर्वोच्च न्यायालयापेक्षा वेगळा आदेश देण्याचा राज ठाकरे यांना अधिकार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ ही वेळ सोडून अन्य वेळी पोलिसांची अनुमती घेऊन ध्वनीवर्धक लावायचे आहेत. राज ठाकरे सर्वाेच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

या वेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘देशात जाणूनबुजून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात केवळ भोंगे, शरद पवार यांवर टीका आणि त्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य  पहायला मिळाले. ‘राज ठाकरे यांच्या भाषणात काही आक्षेपार्ह होते का ?’, यासंबंधी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त अभ्यास करत आहेत. कायदेशीर मत घेऊन याविषयी निर्णय घेतला जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत. एखाद्या विशिष्ट किंवा मुसलमान समाजाला समोर ठेवून त्यांनी काही भूमिका घेतली असेल, तर याचा परिणाम केवळ मुसलमान नाही, तर रात्री ११ वाजेपर्यंत चालणारी कीर्तने, पहाटेच्या काकड आरती, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, तमाशे, गोंधळ, जागरण यांवरही होईल. वारकारी संप्रदायावर याचा अधिक परिणाम होईल.’’ (गणेशोत्सव, नवरात्री या वेळी सरकारच्या आदेशाचे पालन करत हिंदूंनी नेहमीच सहकार्य केले आहे. आता मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न आल्यावर त्यांच्या परिणामांविषयी सांगणाऱ्या गृहमंत्र्यांनी जे अवैध आहे, त्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाच्या आदेशावर कारवाई करण्यास पोलिसांना कुणी रोखले आहे ? याविषयी प्रथम गृहमंत्री सांगतील का ? 
  • सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत म्हणून तर राज ठाकरे यांना ही भूमिका घेण्याची वेळ आली ! ते पाळले असते, तर हे सूत्र कशाला उपस्थित झाले असते ?