भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
मुंबई – भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो, असे आमचेही मत आहे. आम्ही त्याविरोधात लढाई दिली आणि त्यानंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. देशात कायद्याचे राज्य असेल, तर कायद्याचे पालन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. भोंग्यांविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या पर्यायावर ते बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की, भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय आहेत. या भोंग्यांमागे कोणाची वीज आहे, हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही. हे लेचापेचांचे राज्य नाही. भोंग्यांविषयी काय करायचे, हे सरकारला माहिती आहे.
किती काळ तुम्ही बाबरीच्या विषयावर बोलणार आहात ? देशात महागाई, बेरोजगारी, चीनने केलेली घुसखोरी यांवरून लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालिसा आणि बाबरी या सूत्रावर भाजप आणि त्यांच्याशी संबंधित पक्ष बोलत आहे, अशी टीका राऊत यांनी या वेळी भाजपवर केली. ‘बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती ?’, असे कोणी विचारत असेल, तर त्यांनी त्या काळातील केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा, असे संजय राऊत म्हणाले.