महाराष्ट्रात पुढील ५ दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाट !
चंद्रपूर येथे तापमान ४५ अंश सेल्यसिअसच्या पुढे जाणार !
नागपूर – एप्रिल मध्ये नागपूरसह विदर्भातील तापमान ४५ अंश सेल्यसिअसच्या पुढे गेले होते. आता मे मध्येही उकाड्यापासून कोणताही दिलासा मिळणार नाही. मे मासात उकाडा कायम रहाणार आहे. पुढील ५ दिवसानंतर विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट असणार आहे, अशी माहिती येथील हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी २ मे या दिवशी दिली. विशेष म्हणजे पुढील ३ दिवसांत विदर्भात हलक्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताने ३७४ रुग्ण आजारी पडले आहेत, तर २५ जणांचा बळी गेल्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. कामाव्यतिरिक्त उन्हात जाऊ नये, त्याचसमवेत अधिक पाणी प्यावे, असा उपदेश आरोग्य विभागाने दिला आहे.