सतत इतरांचा विचार करणाऱ्या रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !
आज वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजे अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेर यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि सून यांनी वर्णन केलेला त्यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे. २ मे २०२२ या दिवशी आपण पू. खेरआजी यांच्याविषयी ‘जन्म आणि बालपण, शिक्षण, रहाणीमान आणि सनातन संस्थेशी झालेला संपर्क’ हा भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया. (भाग २)
या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/575910.html
पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांच्या चरणी ९० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
७. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधना
७ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून स्थिर राहून साधना चालू ठेवणे : ‘पू. आजींना सत्संग मिळावा’, यासाठी त्यांना ‘सनातनचे अन्य कार्यक्रम आणि गुरुपौर्णिमा यांसाठी घेऊन जावे’, असे आम्हाला वाटायचे; पण पू. आजी पूर्वी जुन्या वाड्यात एकत्र कुटुंबात रहायच्या. घरात पूर्वजांच्या त्रासाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कुटुंबियांमध्ये आपापसांत मतभेद होते. त्याही परिस्थितीत पू. आजी गुरुमाऊलीवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) श्रद्धा ठेवून स्थिर राहून तेथेच साधना करायच्या.
७ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगून प्रत्येक कृती करणे : घरातील कामे आणि स्वयंपाक झाल्यावर पू. आजी दुपारी १२.३० वाजता परात्पर गुरु डॉक्टरांना नैवेद्य दाखवायच्या. त्यांना कधी नैवेद्य दाखवण्यास उशीर झाला, तर त्या गुरुदेवांना सांगायच्या, ‘परम पूज्य, आज मला उशीर झाला. मला क्षमा करा.’ त्या प्रत्येक कृती गुरुमाऊलीला सांगूनच करायच्या. ‘भाव कसाठेवायचा ?’, हे मला (सौ. मीनल मिलिंद खेर (सून) यांना)) त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
८. पू. मंगला खेरआजी यांची गुणवैशिष्ट्ये
८ अ. पू. आजी त्यांची ठरलेली कामे ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या समयमर्यादेत करायच्या.
८ आ. शिकण्याची वृत्ती : पू. आजींचा मुलगा (श्री. मिलिंद खेर) आणि सून (सौ. मीनल मिलिंद खेर) हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यामुळे त्यांच्या घरी साधक यायचे. पू. आजी साधकांच्या वागण्या-बोलण्यातून शिकून तशी कृती करत असत.
८ इ. पू. आजी घरी आलेल्या साधकांना अल्पाहार किंवा जेवण देत असत.
८ ई. मुलगा आणि सून यांना साधनेत साहाय्य करणे : पू. आजींनी मुलगा आणि सून यांना साधनेसाठी कधी विरोध केला नाही. त्यांना प्रसारासाठी बाहेर जावे लागायचे. तेव्हा पू. आजी ‘घरची कामे करणे’, ही माझी सेवा आणि साधना आहे’, असा भाव ठेवून सर्वकाही न कंटाळता आनंदाने करायच्या. त्या दिवसभर कार्यरत राहूनही कधी थकलेल्या किंवा कंटाळलेल्या दिसायच्या नाहीत.
८ उ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे : त्यांची प्रतिदिन दुपारची विश्रांती, म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्याविना त्यांना चैन पडत नसे. त्या प्रतिदिन सनातनचे ग्रंथही वाचायच्या.
८ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : ‘माझी प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) सतत माझ्या समवेत असते. तीच मला शक्ती देते आणि तीच माझ्याकडून सर्व करवून घेते; म्हणून माझ्याकडून सर्व कामे होत आहेत’, असा पू. आजींचा भाव होता आणि त्या तसे अनुभवतही होत्या. त्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृती प.पू. गुरुमाऊलीला सांगूनच करायच्या. त्या रात्री झोपतांना प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र अन् दैनिक ‘सनातन प्रभात’ जवळ घेऊन झोपायच्या.
९. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आजींना ‘तुमची साधना चांगली चालू आहे’, असे सांगणे
एकदा पू. आजी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. त्या वेळी पू. आजींनी प.पू. गुरुमाऊलीला विचारले, ‘‘मी आणखी काय प्रयत्न करू ?’’ तेव्हा प.पू. गुरुमाऊली त्यांना म्हणाली, ‘‘तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा. तुमची साधना चांगली चालू आहे.’’
१०. वर्ष २०११ मध्ये पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आणि १३.९.२०१५ या दिवशी त्या संतपदावर आरूढ झाल्या.’
(क्रमशः)
– सौ. माधुरी प्रकाश दीक्षित, सातारा (मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के (रामनाथी आश्रमातील सौ. मंजिरी विनायक आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या आई)) आणि सौ. मीनल मिलिंद खेर, रत्नागिरी (सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), रत्नागिरी (२३.३.२०२२)
पू. (श्रीमती) मंगला खेर रुग्णाईत असूनही त्यांचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी दिसणे अन् त्यांच्या सहवासात पुष्कळ आनंद होणे‘आमच्या घरी प्रत्येक रविवारी असलेल्या ‘ऑनलाईन साधना सत्संगा’मध्ये मला विषय मांडण्याची सेवा असते. एका रविवारी आमच्या घरी सत्संग घेण्यात अडचण येणार होती. तेव्हा तो सत्संग आमच्या घराजवळच असलेल्या पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांच्या घरी ठरवण्यात आला. मी त्यांच्या घरी सत्संग घेण्यासाठी गेलो. पू. आजी रुग्णाईत असल्याने अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून आहेत, तरीसुद्धा त्यांचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होता. पू. आजींच्या सहवासात सत्संग घेण्याची सेवा केल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.’ – श्री. गोविंद शरद भारद्वाज, रत्नागिरी (२७.३.२०२२) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |