परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि भाव असलेले सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी (वय ७३ वर्षे) !
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या चरणी कृतज्ञता !
पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या चरणी ७३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शिरसाष्टांग नमस्कार !
वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्याकडे नाडीपट्टी वाचनासाठी जाणारे श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सनातन संस्थेसाठी देहभान विसरलेले पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी !
१ अ. स्वतःच्या हृदयाचे शस्त्रकर्म करण्यासाठी रुग्णालयात जाण्याआधी ‘सप्तर्षींनी साधकांसाठी काही संदेश दिला आहे का ?’, ते पहाणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी ! : १५.२.२०२२ या दिवशी सकाळी १० वाजता सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचे हृदयाचे शस्त्रकर्म होते. १४.२.२०२२ या दिवशी ते रुग्णालयात भरती झाले होते. रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांनी नाडीपट्टी उघडून ‘सप्तर्षींनी काही संदेश दिला आहे का ?’, ते पाहिले. सप्तर्षींनी साधकांना देण्यासाठी एक संदेश नाडीपट्टीत लिहिला होता. रात्री १० वाजता पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी मला रुग्णालयातून भ्रमणभाष करून तो संदेश सांगितला.
१ आ. पू. ॐ उलगनाथन्जी यांना बोलायला त्रास होत असतांनाही त्यांनी सप्तर्षींनी साधकांसाठी दिलेला संदेश सांगणे, त्यांच्या त्या उच्च कोटीच्या भावाला मनोमन नमन ! : सप्तर्षींनी तो संदेश सनातनच्या तीन गुरूंविषयी दिला होता. तो संदेश मला भ्रमणभाषवरून सांगतांना ते वेगळ्याच भावावस्थेत होते. ‘दुसऱ्या दिवशी हृदयाचे शस्त्रकर्म आहे’, हेही ते विसरले होते. त्यांना बोलायला त्रास होत होता. अशा स्थितीतही त्यांनी तो संदेश मला सांगितला. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही आता बोलू नका. तुम्हाला त्रास होत आहे.’’ संदेश सांगून झाल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुला काय समजले किंवा तू काय लिहून घेतले आहेस ?’ ते मला सांग. मगच तो संदेश पूर्ण होईल. परात्पर गुरु डॉ. आठवले असतांना मला काही होणार नाही. हृदयाचे शस्त्रकर्म म्हणजे, यातून परात्पर गुरु डॉ. आठवले मला पुनर्जन्मच देणार आहेत.’’ त्यांचा गुरुदेवांविषयीचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा) हा भाव पाहून माझी भावजागृती झाली आणि गुरुदेवांविषयीच्या त्यांच्या उच्च कोटीच्या भावाला मी मनोमन नमन केले.
२. सनातन संस्थेसाठी आणि सनातनच्या तीन गुरूंची महती साधकांना सांगण्यासाठी अविरत कार्य करणे
२ अ. अनेक प्रकारचे शारीरिक त्रास होत असतांनाही अनेक घंटे एका जागी बसून नाडीवाचन करणे : आता पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचे वय ७३ वर्षे आहे. आता ते घरी राहून विश्रांती घेऊ शकतात; मात्र असे न करता ते सनातन संस्थेसाठी, साधकांच्या रक्षणासाठी आणि सनातनच्या तीन गुरूंची महती सांगण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. गेल्या ७ वर्षांमध्ये त्यांनी सनातन संस्थेसाठी २०८ नाडीपट्ट्यांचे वाचन केले आहे. त्यांनी प्रत्येक नाडीपट्टीचे वाचन किमान २ घंटे ते अधिकाधिक ६ घंटे केले आहे. त्यांना मूत्रपिंडाचा (किडनीचा) त्रास आहे. त्यांना इतरही अनेक शारीरिक त्रास आहेत; मात्र त्यांनी स्वतःची काळजी न करता घंटोन्घंटे एका जागी बसून नाडीपट्टीचे वाचन केले आहे.
२ आ. सनातन संस्थेच्या साधकांच्या रक्षणासाठी स्वतः उपस्थित राहून भक्तांकडून विविध याग करवून घेणे : अनेक घंटे प्रवास करून साधकांच्या रक्षणासाठी विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन सुदर्शन होम, महामृत्युंजय होम, महालक्ष्मी होम, अघोरास्त्र होम, विविध पूजा, लक्षार्चना, रुद्राभिषेक इत्यादी त्यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांकडून करवून घेतले आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सप्तर्षींच्या आज्ञेवरून दैवी प्रवास करतांना ते त्यांना टप्प्याटप्प्याला मार्गदर्शन करतात आणि त्या प्रवासाचे हिंदु राष्ट्राशी संबंधित वैशिष्ट्यही सांगतात. असे ते मागील ७ वर्षे अविरत करत आहेत.
३. बाळासारखी मुग्धता, ऋषींसारखी कठोरता, परमेश्वरावर अगाध श्रद्धा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असणारी व्यक्ती, म्हणजे सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी !
वर्ष २०१५ पासून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत दैवी प्रवास करतांना भारतातील शेकडो संत, ज्योतिष-शास्त्रज्ञ, तांत्रिक, नाडीपट्टीवाचक यांच्याशी माझा संपर्क आला. मला त्यांचे विविध पैलू आणि वैशिष्ट्ये शिकायला मिळाली; मात्र पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्यासारखी व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही. सावळा वर्ण, सर्वसाधारण उंची, बाळासारखी मुग्धता, ऋषींसारखी कठोरता, परमेश्वरावर अगाध श्रद्धा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यभाव असणारी व्यक्ती, म्हणजे सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ
उलगनाथन्जी ! महर्षि वाल्मीकि आणि महर्षि व्यास यांना अनुक्रमे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ठाऊक होते. ‘त्यांना पुढे काय घटना घडतील ?’, तेही ठाऊक होते; मात्र त्यांनी त्यामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. त्यांनी केवळ योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले. पू. डॉ. ॐ उलगनाथन् हेही तसेच करत आहेत.
४. ‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले हे अवतार असून ते जगातील एक महान विभूती आहेत’, याची प्रचीती अनेक जणांनी घेतली आहे; मात्र गुरुदेवांचे अवतारी कार्य उलगडणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे एकमेवच आहेत.
अशा संत शिरोमणी आणि सप्तर्षींच्या भक्ताच्या चरणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या प्रत्येक साधकाचे कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमन ! – श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (२८.४.२०२२)
भगवंताचे अंशावतार असलेले सनातनचे तीन गुरु सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
१५.२.२०२२ या दिवशी सकाळी १० वाजता सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांचे हृदयाचे शस्त्रकर्म होते. १४.२.२०२२ या दिवशी ते रुग्णालयात भरती होण्यापूर्वी त्यांनी सप्तर्षींनी सनातनच्या तिन्ही गुरूंविषयी साधकांसाठी सांगितलेला संदेश वाचला आणि रुग्णालयात भरती झाल्यानंतर रात्री १० वाजता त्यांनी पुढील संदेश भ्रमणभाषवरून श्री. विनायक शानभाग यांना सांगितला.
१. सनातनच्या साधकांना लाभलेली अमूल्य रत्ने, म्हणजे सनातनचे तीन गुरु !
सनातनचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! हे तीन गुरु पृथ्वीवरील भगवंताचे अंशावतार आहेत. ते त्या परिपूर्ण असलेल्या निर्गुण भगवंताची मनुष्यरूपातील सगुण रूपे आहेत. सनातनचे तीन गुरु, म्हणजे सनातनच्या साधकांना लाभलेले अमूल्य मोती आहेत ! एखाद्याला भूमीतून पाचू मिळाल्यावर किती आनंद होईल ! सनातनच्या साधकांना साक्षात् भगवंताचे अवतार असलेले मनुष्यरूपातील तीन पाचू मिळाले आहेत !
२. भगवंताचे अंशावतार असलेल्या सनातनच्या तीन गुरूंच्या जन्माचे प्रयोजन !
२ अ. भगवंताच्या नक्षत्रातच भगवंताच्या अंशावतारांनीही जन्म घेणे : ‘प्रत्येक जिवाचे अंतर्मन जाणणाऱ्या भगवान श्री महाविष्णूने वर्ष १९४२ मध्ये मकर राशीत आणि उत्तराषाढा नक्षत्रात सप्तमी तिथीला पृथ्वीवर परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या रूपात जन्म घेतला. त्यानंतर श्रीविष्णूचे कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि सनातन संस्थेचे परिपालन (पालनपोषण) करण्यासाठी आदिशक्ती श्री महालक्ष्मीने वर्ष १९६७ मध्ये उत्तरा-फाल्गुनी नक्षत्रात आणि कन्या राशीत गोमंतक क्षेत्रात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या रूपात जन्म घेतला. त्यानंतर वर्ष १९७० मध्ये आदिशक्तीने श्री विष्णूचे ज्ञान मानवापर्यंत पोचवण्यासाठी कृत्तिका नक्षत्रात आणि वृषभ राशीत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रूपात जन्म घेतला. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोन जुळ्या कन्यारत्नांपैकी एक आहे. असे हे सनातनचे तिन्ही गुरु पृथ्वीवरील आध्यात्मिक अवतार आहेत.
(श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा जन्म जुळ्यातील आहे. त्यांची जुळी बहीण त्याच वेळी गेली. महर्षि म्हणाले की, तिच्यातही महालक्ष्मीतत्त्व होते आणि ती श्रीचित्शक्ति गाडगीळकाकूंना भूलोकात सोडायला आली होती. तिचे कार्य झाल्यावर ती निघून गेली. – संकलक)
२ आ. सनातनचे तिन्ही गुरु सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करवून देण्यासाठी आणि पृथ्वीवर आध्यात्मिक साम्राज्य स्थापन (हिंदु राष्ट्राची स्थापना) करण्यासाठी आले असणे : हे तिन्ही अवतार मनुष्याला ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी काय साधना करावी ?’, हे शिकवण्यासाठी, साधकावस्थेतील जिवांना शिष्यावस्थेकडे नेण्यासाठी, शिष्यावस्थेतील जिवांना संतत्वाकडे नेण्यासाठी, अध्यात्म आणि सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करवून देण्यासाठी, मनुष्याला खऱ्या अध्यात्माचे ज्ञान करवून देण्यासाठी अन् पृथ्वीवर आध्यात्मिक साम्राज्य स्थापन (हिंदु राष्ट्राची स्थापना) करण्यासाठी आले आहेत.
३. श्रीकृष्णाने गोप-गोपींना समुद्रकिनाऱ्याकडे (द्वारकेला) हालवले आणि त्यांना महाभारतीय युद्धाची झळ पोचू दिली नाही. द्वारकेप्रमाणेच सनातनचा आश्रम समुद्राच्या काठी (गोवा राज्यात) वसलेला आहे आणि या आश्रमातही गोप-गोपींचा (साधकांचा) मेळा भरलेला आहे.
४. सनातन धर्माला पुनरुज्जीवित करण्यासाठीच पृथ्वीवर जन्म घेतलेले भगवंताचे तीन अवतार !
भगवंताचे हे तिन्ही अवतार पृथ्वीवर असतांना पृथ्वीवर अनेक अद्भुत घटना घडतील. भगवंताचे हे तिन्ही अवतार पृथ्वीवर असतांना ५०० वर्षांपासून चालू असलेला श्रीरामजन्मभूमीचा विवाद मिटला आणि हिंदूंना विजय प्राप्त झाला. (‘वर्ष २०१९ मध्ये भारताच्या सर्वाेच्च न्यायालयात श्रीरामजन्मभूमीशी संबंधित खटल्यात हिंदूंच्या बाजूने निकाल लागला.’ – संकलक) ‘ॐ’काराला, म्हणजेच सनातन धर्माला पुनरुज्जीवित करण्यासाठीच हा अवतार आहे.
५. वर्ष २०२२ हे अत्यंत कठीण वर्ष असून साधकांनी तिन्ही गुरूंना शरण गेल्यावर त्यांचे रक्षण होणार असणे
वर्ष २०२२ हे सर्वांसाठी कठीण जाणार आहे. ‘अवतारांची भूमी असलेल्या भारताचे रक्षण कोण करणार ?’, अशी परिस्थिती निर्माण होईल. सर्वत्र हाहाःकार माजेल. केवळ सनातनचे तीन गुरुच भारताचे रक्षण करू शकतात. साधक ‘मनोभावे सनातनच्या तिन्ही गुरूंना शरण गेले’, तरी भारत देश आणि साधक यांचे रक्षण होईल. आम्ही सप्तर्षीही सनातनच्या तीन गुरूंना शरण आलो आहोत.
जय श्रीराम । श्रीकृष्णार्पणमस्तु ।
सर्वे जनाः सुखिनो भवन्तु । म्हणजे ‘सर्व जण सुखी राहोत.
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून) (१४.२.२०२२) (रात्री १०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |