कौटुंबिक छळ का ?
महिलांच्या कौटुंबिक तक्रारी सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘राज्य महिला आयोगा’च्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी स्वतः राज्यातील अनेक भागांत दौरा केला. यामध्ये कौटुंबिक छळाच्या सर्वाधिक तक्रारी संभाजीनगर येथे आढळल्या. या तक्रारी ऐकून सौ. रूपाली चाकणकरांसह अधिकारीही सुन्न झाले. ही स्थिती गंभीर, चिंताजनक आणि सर्वांना विचार करायला लावणारी आहे. कौटुंबिक कलहाची उदाहरणे कमी अधिक प्रमाणात सर्वच कुटुंबांमध्ये असतील; परंतु हा त्रास ‘राज्य महिला आयोगा’समोर मांडावा वाटतो, याचा अर्थ तक्रारीची भीषणता किती प्रमाणात असेल, याचा अंदाज येतो.
संवेदनशील आणि गंभीर समस्येवर महिला या नात्याने सौ. चाकणकर म्हणाल्या, ‘‘या प्रकरणांचा निपटारा तातडीने करा. महिलांना त्रास देणारे नोटिसा बजावूनही समोर येत नसल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदवा. महिलांची दुर्बलता लक्षात घेऊन अत्याचार होतात. त्यामुळे त्यांना सक्षम केले पाहिजे. समुपदेशन पटापट घ्या; कारण विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच असतो.’’ सौ. चाकणकर यांनी सांगितलेल्या सर्व सूचना अत्यंत योग्य आहेत. याप्रमाणे कदाचित सर्व अधिकारी संवेदनशीलतेने सर्व करतीलही; परंतु तरीही छळाची प्रकरणे अल्प होतील का ? याचे उत्तर ‘नाही’, असेच असेल; कारण प्रत्येकाच्या जीवनातील दुःखाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असते. प्रत्येक वेळी शारीरिक आणि मानसिक स्तरावरील उपाययोजनांना प्राधान्य दिले जाते; परंतु आध्यात्मिक स्तरावरील उपायांना प्राधान्य दिले जात नाही. हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यामुळे दुःखाचे कारण आध्यात्मिक असते, हेच ठाऊक नाही. आध्यात्मिक कारणांमुळे होणारी दुःखे दूर होण्यासाठी धर्मशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार साधना करणे आवश्यक आहे. साधना केल्यास प्रारब्ध सुसह्य होते, त्यामुळे आपोआपच कौटुंबिक कलहही न्यून होतात.
त्यामुळे ‘राज्य महिला आयोगा’ने वरील उपाययोजनांसमवेत धर्मशास्त्र समजून घेऊन महिलांसह संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यास प्रवृत्त केल्यास खऱ्या अर्थाने समस्या सुटतील. यासाठी संबंधितांनीही साधना करून अनुभूती घेतल्यास याचे प्रबोधन चांगल्या प्रकारे होईल, हे निश्चित ! सरकारने यामध्ये लक्ष घालून हिंदूंना धर्मशिक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष दिल्यास खरा विकास होईल.
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, देवद, पनवेल.