भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !
नवी देहली – भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे. ते भारतात बनवलेली संरक्षण उत्पादने इतर देशांमध्ये निर्यातही करू शकतील. सध्या भारतीय संरक्षण उपकरणांचे ६७ टक्के उत्पादन भारतातच होत आहे, तसेच भारतीय नौदल ९५ टक्के गरजा भारतातूनच पूर्ण करत आहे.
Centre amends weapons acquisitions procedure in major 'Make in India' push https://t.co/TXKRvxA1Be
— TOI Top Stories (@TOITopStories) April 25, 2022
१. सरकारकडून संरक्षण खरेदी धोरणात पालट करून ‘बाय-ग्लोबल’ (विदेशातून खरेदी) ही श्रेणी रहित केली जाणार आहे. या श्रेणीच्या अंतर्गत परदेशात बनवलेल्या वस्तूंची आयात केली जाते. भारतीय वायूदल लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, वाहतूक विमाने आणि ड्रोन यांचे स्वदेशी उत्पादन करण्यासही उत्सुक आहे.
२. विदेशी भूमीवर बनवलेल्या उपकरणांवर अवलंबून राहिल्यामुळे देशाचे राजनैतिक पर्याय मर्यादित रहाण्याची शक्यता असतेे. जगातील मोठे देश स्वत:च्या देशात बनवलेली शस्त्रेच वापरतात. भारत-रशिया यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सिद्ध करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचाही रशियाच्या सैन्यात समावेश करण्यात आलेला नाही; कारण तेथे विदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे.