मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट
खाणी चालू करणे आणि राज्याला देशाची पर्यटन राजधानी बनवणे यांवर चर्चा
पणजी, १ मे (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देहली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत गोव्यात खाणी चालू करणे आणि गोवा राज्य देशाची पर्यटन राजधानी बनवणे या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी दुसर्यांदा नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घेतलेली ही पहिलीच भेट आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
या भेटीविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘या भेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खाण, पर्यटन, मोपा विमानतळ आणि महामार्गाचे बांधकाम या विषयांवर चर्चा केली. गोवा राज्य देशाची पर्यटन राजधानी बनवण्यासाठी केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे. खाणी चालू करण्यास अनुमती मिळाल्यानंतर लवकरच खाणींची निविदा काढण्यात येणार आहे.’’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देहली भेटीच्या वेळी देहली येथे देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील सर्व उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश यांच्या एका संयुक्त कार्यक्रमालाही उपस्थिती लावली.