एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात महाराष्ट्रात रोखले १ सहस्र ३३८ बालविवाह !
यंत्रणेला सतर्कतेचे आदेश !
हिंगोली – राज्यामध्ये एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात राज्यातील विविध भागांमध्ये १ सहस्र ३३८ बालविवाह प्रशासनाने रोखले होते. बालविवाहांची होणारी संख्या लक्षात घेता आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार्या विवाहांवरही प्रशासनाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्राम बाल संरक्षण समित्यांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. महिला आणि बालविकास आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवले आहे.
१. राज्यात कोरोनाच्या काळामध्ये घरच्या घरी अनेक विवाह सोहळे झाले. यामध्ये बर्याच ठिकाणी बालविवाहही झाले आहेत; मात्र त्यांची वाच्यता कुठेही करण्यात आली नाही. सततची दळवळण बंदी, ऑनलाईन शाळा आणि बेरोजगारी यांमुळे बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे.
२. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाहाचे मुलींच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांची माहितीही देण्यात आली आहे.
३. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार्या विवाहांकडे लक्ष ठेवण्यासाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
४. या कालावधीत बालविवाह होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील बालकल्याण समिती, पोलीस अधीक्षक, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्राम संरक्षण समित्या यांना आदेशित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
५. महिला आणि बाल विकास आयुक्तालयाच्या या पत्रानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून बैठका घेतल्या जात आहेत.
तळणी (जिल्हा हिंगोली) येथील बालविवाह सोहळा रहित !
हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तळणी येथे विवाह सोहळ्यात ध्वनीक्षेपक लावून नाचण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये तलवारी बाहेर काढून आक्रमण करण्यात आले. यामध्ये ५ जण घायाळ झाले असून त्यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. नरसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केल्यानंतर नववधू अल्पवयीन असल्याने विवाह सोहळा रहित करण्यात आला. ही घटना २८ एप्रिल या दिवशी घडली. हाणामारी प्रकरणांमध्ये रवि वाकळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रवि खंदारे आणि अमोल खंदारे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाबालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही सहस्रो बालविवाह होणे चिंताजनक ! |