‘डेसिबल’चा नियम एकाच धर्माला सांगू शकत नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

प्रशासनाने सामाजिक स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा समान ठेवावी !

मुंबई – मशिदींवरील भोंग्यांना आता केवळ आम्ही पर्याय दिला आहे. भोंग्यांचा त्रास आम्ही आमच्या कानांना किती दिवस करून घ्यायचा. दिवाळीत फटाके किती ‘डेसिबल’ असावेत ? याविषयी जेव्हा सांगितले जाते, तेव्हा दुसर्‍या बाजूलाही हे सांगितले पाहिजे. ‘डेसिबल’ किती असावे ? हे तुम्ही एकाच धर्मासाठी सांगू शकत नाही, असे स्पष्ट मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. ३० एप्रिल या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘शाळा ‘शांतता क्षेत्रा’त येत असल्यामुळे तेथे सभा घेता येत नाही. त्या वेळी आम्हाला नियम सांगितले जातात. ध्वनीवर्धकाचा वयस्कर, विद्यार्थी यांना त्रास होतो, त्याचे काय ? पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एका मुसलमान पत्रकाराने त्याच्या लहान मुलाला भोंग्याचा त्रास होत असल्याचे मौलवीला सांगितले. मुसलमान समाजालाही भोंग्याचा त्रास होतो. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीवर्धक लावला जातो, तेव्हा आपल्यालाही त्रास होतो ना ? त्यामुळे सर्वांसाठी एक नियम लागू केल्यासच हे प्रकार थांबतील.’’