मुंबईतील वृत्तपत्रांच्या किमती १ जूनपासून वाढवण्याचा निर्णय !
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या बैठकीतील निर्णय
मुंबई – मुंबईतील वृत्तपत्रांच्या किमती १ जूनपासून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वृत्तपत्रांसाठी लागणार्या कागदाचे वाढलेले दर, कोरोना संकटात झालेली हानी यांमुळे हा निर्णय ‘शिवनेरी’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वृत्तपत्र विक्रेता संघटनांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र व्यवस्थापनाचे अधिकारी, युनायटेड फोरम ऑफ न्यूजपेपर मुंबईचे अध्यक्ष बाजीराव दांगट यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. वृत्तपत्र व्यवसायातील समस्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
मुंबईतील रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर वृत्तपत्र मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे हे ‘स्टॉल’ वृत्तपत्र विक्रेत्यांना चालवण्यासाठी मिळावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्यासंबंधी रेल्वेमत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले.
या वेळी वृत्तपत्र व्यवस्थापन आणि विक्रेते यांच्याकडून देसाई यांचा सत्कार करण्यात आला.