इंग्रजीच्या बेडीत अडकलेली ‘मराठी’ !
१ मे या दिवशी आपण ‘महाराष्ट्रदिन’ साजरा केला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठी सध्या इंग्रजी शब्दांच्या बेडीत अडकली आहे. साहित्य, पत्रकारिता, सामाजिक माध्यमे, प्रशासन, शासन या प्रत्येक ठिकाणी आणि सामान्य नागरिकही मराठी बोलतांना सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतांना आढळतात. विशेष करून वर्ष २०१० नंतर जसजसा सामाजिक माध्यमांचा वापर वाढत गेला, तसतसे मराठी भाषेत इंग्रजी भाषेतील शब्द मोठ्या प्रमाणात घुसण्यास प्रारंभ झाला.
सध्या बोलतांना २-३ इंग्रजी शब्दांविना मराठी वाक्य पूर्णच होऊ शकत नाही, अशी सामान्य माणसांची सद्यःस्थिती आहे. ‘तुमचा मोबाईल नंबर काय ?’, ‘तुमचे नाव ॲड करतो आणि व्हॉट्सॲपला हाय टाकतो’, ‘पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी ट्राय कर आणि नंतर शॉपिंग कर’, ‘मी रिंग केली होती, तू ‘मिस्ड कॉल’ पाहून मला कॉल केला नाहीस’, ‘बर्थ डे ला काय गिफ्ट करणार ?’, ‘मी शार्प ८ ला पोचेन’, ‘ट्रेन किती लेट आहे’, असे संवाद सर्रास आपल्या कानावर पडतात. रेल्वे, बस, कुठेही प्रवास वा खरेदी करतांना, उपाहारगृहात अगदी जेव्हा मराठी माणसे भेटतात, तेव्हा ‘हॅलो, अरे यार कसा आहेस ? नाइस टू मीट यू’, असे सहज बोलून जातात. सामाजिक माध्यमांत तर अनेक जण टंकलेखन करतांना ‘tu kadhi yenar ? (तू कधी येणार ?)’, अशा प्रकारे इंग्रजी-मराठी टंकलेखन करतात.
महाविद्यालयातील तरुण मुलांच्या अंगावरील ‘टी शर्ट’ इंग्रजी शब्दांनी भरलेले असतात. युवक-युवतीच नाही, तर महिला-पुरुष यांनाही ‘इंग्रजी टॅटू’ काढणे अभिमानास्पद वाटते. ‘हॅलो’, ‘थॅक्स’, ‘गुड मॉर्निंग’, ‘येस’, ‘नो’ हे शब्द तर आता इतके अंगवळणी पडले आहेत की, कदाचित मराठीच्या पुढच्या शब्दकोशात ते येतील की काय ? अशी स्थिती आहे. कुणाला अ, आ, इ. ची बाराखडी म्हणायला सांगितल्यास किती जणांना येईल, याची शंका आहे. ज्या शिवछत्रपतींनी स्वतंत्र मराठी कोष निर्माण केला, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषा शुद्धीची चळवळ राबवली, त्यांचे आपण पाईक आहोत, हेच मराठीजन विसरले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी मराठीजनांना प्रयत्नपूर्वक ‘इंग्रजी’चे जोखड टाकून द्यावे लागेल. हाच निर्धार महाराष्ट्रासाठी प्राणत्याग करणार्या हुतात्म्यांना श्रद्धांजली असेल !
– श्री. अजय केळकर, सांगली