केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निकालामध्ये केंद्र सरकारही पक्षकार होते. त्यामुळे केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. ‘सध्या मला हे (भोंग्याचे) सूत्र आता गौण वाटत आहे; कारण माझ्यासमोर राज्याला पुढे कसे न्यायचे ? हा प्रश्न आहे. गुंतवणूक वाढवून थांबलेले अर्थचक्र परत फिरवायचे आहे’, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या वेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,…
१. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व धर्मियांना लागू आहे. त्यामुळे नुसते भोंगे काढा, असे नाही. आपल्याला सर्व धर्मियांना तो आदेश पाळावा लागेल. त्यासाठी मागील आठवड्यात गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. ‘केंद्र सरकारने जशी नोटाबंदी आणि दळणवळण बंदी देशभर लागू केली, तशी भोंगाबंदी देशभर करण्यात यावी’, असे या बैठकीत ठरले.
२. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे काढले; परंतु जे अनुमती मागतील, तिथे परत भोंगे चढणार आहेत. भोंग्यांसाठी सर्वांनाच अनुमती घ्यावी लागणार आहे. सर्वांनाच आवाजाची मर्यादा पाळावी लागेल. यातील खरे सूत्र अजान नसून आवाज हे आहे; मात्र हे ज्यांना कळत नाही, ते अजाणतेपणाने बोलतात.