अक्षय्य आनंदासाठी धर्मदान देऊया !
अक्षय्य तृतीया सण आला की, प्रत्येक हिंदु धर्मीय दान-धर्म करण्याचा पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा पाळण्याचा आणि सोने-नाणे खरेदी करण्याचा हक्काचा काळ समजतो. या दिवशी विविध प्रकारची दाने देण्याचा प्रघात आहे. वैयक्तिक उपासना, तसेच कौटुंबिक कल्याण या दृष्टींनी ते सर्व आवश्यक आहेच; मात्र सध्या देव, देश आणि धर्म हे आपत्तीतून जात आहेत. अशा वेळी केवळ वैयक्तिक सुख-समाधानाचा विचार केला, तर अशी कोट्यवधी कुटुंबे ज्यामध्ये सामावलेली आहेत, ते महाकुटुंब म्हणजेच आपल्या भारत देशाचा विचार कोण करणार ? ‘जो धर्म आपल्या अनेक पिढ्यांना युगानुयुगे सांभाळत आला आहे, त्याची दु:स्थिती होत असतांना त्याचे रक्षण कोण करणार ?’, याचा विचार केला पाहिजे.
नेताजींचा आदर्श !
भारत पारतंत्र्यात असतांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतियांना ‘तूम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा ।’, असे आवाहन केले होते. भारतियांनी त्याला लगेचच भरघोस प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येत स्वत:कडे जे काही सोने-नाणे, दागिने, वस्तू होत्या, त्या दिल्या; मात्र सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काहींनी स्वत:चा मुलगा, मुलगी, तर कुणी पती स्वातंत्र्य चळवळीसाठी अर्पण केले. या तरुण-तरुणींच्या माध्यमातूनच पुढे नेताजींनी प्रचंड मोठी ‘आझाद हिंद सेना’ उभारली. या सेनेला भारतभरातून पाठिंबा मिळाला. इंग्रजी सैन्यातील भारतीय सैनिकही या सेनेत सहभागी झाले. या सेनेनेच भारतात हानी करणाऱ्या इंग्रजांना ललकारून त्यांच्याशी युद्ध केले. भारतियांच्या या अनपेक्षित सैन्याच्या उभारणीमुळे काही काळाने इंग्रजांना देश सोडून जावे लागले.
धर्म संकटात !
आज धर्म संकटात आहे. श्रीरामनवमी, हनुमान जयंती यांच्या मिरवणुकांवर अनेक राज्यांमध्ये दगडफेक, तसेच सशस्त्र आक्रमणे होत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ते अगदी राजकारण्यांपर्यंत हिंदु धर्माची अक्षरश: खिल्ली उडवली जात आहे. विनोदी कार्यक्रमांतून हिंदूंच्या प्रथा-परंपरांची निंदानालस्ती केली जात आहे. या घटना घडत असतांना त्या रोखण्यासाठी काही कृती करणे हे हिंदूंचे धर्मकर्तव्य नव्हे का ?
अक्षय्य समाधान धर्मच देतो !
धर्म म्हणजे काय ? समाजव्यवस्था उत्तम राखणे, प्राणीमात्रांची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती साध्य करून देणे, याला ‘धर्म’ असे म्हणतात. वैयक्तिक धर्मपालनाच्या समवेत समष्टी स्वरूपातील धर्माचरणाची आज नितांत आवश्यकता आहे. यास्तव धर्म समजून घेऊन त्याचे रक्षण करण्यासाठी वेळ देण्याची आवश्यकता आहे. हिंदूंमधील संकुचित वृत्ती आणि स्वार्थीपणा यांमुळे धर्माकडे दुर्लक्ष झाले. परिणामी भारत १ सहस्र वर्षे पारतंत्र्यात गेला होता. ‘धर्म एव हतो हन्ती, धर्माे रक्षती रक्षित: ।’ या संस्कृत सुभाषिताचा अर्थ ‘धर्माचा नाश करणाऱ्याचा नाश धर्मच करतो आणि धर्माचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण स्वत: धर्म करतो’, असा आहे. यासाठी धर्मरक्षण आवश्यक आहे.
सध्याचे युग हे गुंतवणुकीचे आहे. ‘कशामध्ये गुंतवणूक केल्यावर काय लाभ होतो ?’ याचा प्रत्येक जण विचार करून भविष्यातील स्वप्ने पहातो. आता धर्मकार्यासाठी वेळेची गुंतवणूक केल्यास पुढील भयावह आपत्काळात धर्माकडून निश्चितच काळजी घेतली जाईल. हिंदु धर्मासाठी अनुकूल गोष्टी घडत आहेत. हा पूरक काळ आहे. यात पूर्णतः सहभागी होण्याचा प्रयत्न करायला हवा. अक्षय्य समाधान केवळ धर्मच आपल्याला देऊ शकतो. धर्मकार्यासाठी तन, मन आणि धन यांचे दान आपल्याला जसे शक्य होईल तसे करूया. त्यागावर आधारित भारतीय संस्कृतीचा वसा बाळगूया आणि अक्षय्य तृतीयेला धर्मासाठी योगदान देण्याचा निश्चय करूया !
संकलक : श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०२२)