परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या होणाऱ्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करतांना त्यांना आलेली अनुभूती !

७.४.२०२२ या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव यांचे मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील साधकांना विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या होणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अनमोल मार्गदर्शन लाभले. साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे आणि मार्गदर्शन करतांना पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

१ अ. साधकांनो, ‘साक्षात् भगवान श्री विष्णूंचे अवतार असलेले परात्पर गुरु डॉक्टर आठवले साधकांना याच जन्मात जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त करणार आहेत’, अशी श्रद्धा ठेवा ! : ‘महर्षींनी गौरवलेले नारायणस्वरूप आपले गुरुदेव संपूर्ण विश्वाचे पालनकर्ता आहेत. ते केवळ संकल्पाने सृष्टीमध्ये पालट करू शकतात. आपल्या प्रारब्धाचे डोंगर, पूर्वज आणि वाईट शक्ती यांचे त्रास, साधकांचे स्वभावदोष अन् अहं यांचे कितीही अडथळे असले, तरी विष्णुस्वरूप श्री गुरु इतके सामर्थ्यशाली आहेत की, ‘ते हे सर्वकाही या एकाच जन्मात सहज संपवू शकतात.’ आपण सर्वांनी अशी दृढ श्रद्धा ठेवूया की, ‘माझे श्री गुरु साक्षात् भगवान श्रीविष्णूचा अवतार असून ते मला याच जन्मात जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त करणार आहेत.’

(‘महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्री विष्णूचा अंशावतार आहेत’, असे नाडीपट्टीतून सांगितले आहे.’ – संकलक)

पू. (सौ.) संगीता जाधव

१ आ. देहधारी श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा होत असतांना त्यांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत होत असणे; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त होत असलेल्या ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमात झोकून देऊन सेवा करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्यावा ! : सध्या प्रतिकूल काळ असला, तरी साधनेच्या दृष्टीने तो संधीकाळच (अनुकूल काळ) आहे; कारण गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमामध्ये झोकून देऊन सेवा केल्याने आपल्या सर्वांच्या साधनेला पुन्हा एकदा नव्याने आरंभ होईल. त्यामुळे आपले जुने संस्कार, स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता न्यून होईल. श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होण्यासाठी साधनेची महापर्वणी देणारा ‘हिंदूसंघटन’ हा उपक्रम देत आहे. मी एका ग्रंथात वाचले होते, ‘देहधारी श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा होतो, तेव्हा त्यांचे तत्त्व पुष्कळ मोठ्या प्रमाणात कार्यरत असते.’ आपल्यालाही अशा विष्णुस्वरूप देहधारी श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळत आहे. आपण गुरुकृपा, गुरुतत्त्व आणि चैतन्य यांचा लाभ करून घेऊया.

१ इ. जे जीव गुरुकार्य करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात, त्यांना अनेक देवतांचे आशीर्वाद लाभून त्यांना साधनेच्या पुढच्या टप्यात जाण्यासाठी साहाय्य होणे : ब्रह्मांडातील सर्व देवता, ऋषिमुनी, संत आणि दिव्यात्मे ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमांद्वारे साजरा होणारा हा विष्णुस्वरूप गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा अनुभवण्यासाठी येतात. जो जीव यात सहभागी होईल, त्याला ते मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदान करतात. जे जीव गुरुकार्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात, त्यांना अनेक देवतांचे आशीर्वाद मिळतात. ‘आपल्याला श्री गुरूंची कृपा संपादन करता यावी आणि श्री गुरु आपल्यावर प्रसन्न व्हावेत’, यासाठी ते साधकांकडून मोठ्या प्रमाणात सेवा करवून घेतात. ते आपल्याला साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी शक्ती प्रदान करतात. ते आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण करतात; कारण ‘हा जीव भगवान श्रीविष्णूच्या जन्मोत्सव कार्यात सहभागी झाला आहे’, याचा त्यांना अतिशय आनंद झालेला असतो.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा हा केवळ साधनेत पुढे जाण्यासाठी आतुर असलेल्या जिवांचा उद्धार करण्यासाठीच साजरा होत असणे : आपले श्री गुरु स्वतःसाठी कधीच जन्मोत्सव साजरा करत नाहीत. ते महर्षींच्या आज्ञेनुसार त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात. त्या निमित्ताने ते ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी समाजातील हिंदूंचे संघटन करणे अन् आपल्यासारख्या जड जिवांचा उद्धार करणे, यांसाठी आपल्याला साधना आणि सेवा यांच्या विविध संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे देवता आणि ऋषिमुनी आपल्या साहाय्याला येतात. त्यांच्या आशीर्वादाने आपण साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो.

१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमात तळमळीने सहभागी होऊन साधक करत असलेल्या सेवेचे पुष्कळ कौतुक असणे : ‘आपण आपल्या श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करू शकू’, एवढी आपली पात्रताही नाही. एखादे २ – ३ वर्षांचे लहान मूल आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. त्याच्याकडून ती कृती योग्य प्रकारे होत नसते. ते मूल पडते; पण पुन्हा उठून योग्य कृती करण्यासाठी धडपडते. त्याची ती धडपड पाहून त्याच्या आई-वडिलांना त्याचे कौतुक वाटते. अगदी तसेच आपल्या कृपाळू गुरुमाऊलीलाही आपण या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदूसंघटन’ उपक्रमात तळमळीने सहभागी होऊन करत असलेल्या आपल्या धडपडीचे पुष्कळ कौतुक वाटते.

१ ऊ. जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमात ध्येय ठेवून आणि देहभान विसरून सेवा करावी अन् भगवंताची कृपा संपादन करावी ! : ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या श्री गुरूंच्या जन्मोत्सवास अनंत पटींनी सूक्ष्मातून साहाय्य मिळणार आहे. जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमासाठी आपण आपले वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, धर्मप्रेमी, तसेच देव, देश आणि धर्म यांविषयी आस्था असणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचा अतिशय तळमळीने प्रयत्न करूया. आपण आपले देहभान विसरून स्वतःला या सेवेत अर्पण करायला हवे. शेवटी आपली ही तळमळ आणि धडपड पाहून भगवंतच समाजातील साधना करणारे आणि खरे हिंदुत्वनिष्ठ यांना या ‘हिंदु राष्ट्रा’च्या कार्यामध्ये सहभागी करून घेईल. आपण सर्वांनी असे ध्येय ठेवूया की, या सेवेतून आपण आपल्या साधनेचा असा एक स्तर गाठायचा आहे की, ‘भगवंताने आपल्याला जवळ घेतलेच पाहिजे. आपण सर्व जण हे साध्य करू शकतो; पण त्या दृष्टीने आपले परिश्रम पुष्कळ महत्त्वाचे आहेत.

२. पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेली अनुभूती

२ अ. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमात ब्रह्मांडातील देवता, ऋषिमुनी, संत आणि दिव्यात्मे यांचे तेजस्वी बिंदूस्वरूपात दर्शन होणे : साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा विषय सांगतांना माझ्या डोळ्यांसमोर जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘हिंदूसंघटना’च्या उपक्रमांचे चित्र तरळू लागले, ‘सर्व साधक आणि धर्मप्रेमी स्थानिक मंदिरात ‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी देवाला साकडे घालत आहेत. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवानिमित्त भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ निघाली आहे. त्यामध्ये साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी सहभागी झाले आहेत. विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी होणाऱ्या या उपक्रमासाठी ब्रह्मांडातून देवता, ऋषिमुनी, संत आणि दिव्यात्मे सूक्ष्मातून बिंदू स्वरूपात पृथ्वीवर येत आहेत. हे तेजस्वी बिंदू ‘हिंदूसंघटन’ या उपक्रमात सेवारत असलेल्या साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांच्या मस्तकाजवळ दिसत असून ते जवळ आल्यावर सर्वांना आपोआप नवचैतन्य मिळत आहे. सर्व जण या उपक्रमात उत्साह आणि चैतन्य यांनी भारित होऊन सहभागी होत आहेत अन् सर्वांना त्यांचा कृपाशीर्वाद मिळत आहे.’

– पू. (सौ.) संगीता जाधव, ठाणे (७.४.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक