प्रतापी वीर परशुराम !
वैशाख शुक्ल पक्ष तृतीया ३.५.२०२२ या दिवशी असलेल्या ‘परशुराम जयंती’च्या निमित्ताने…
वैशाख शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी महापराक्रमी वीर परशुरामाचा जन्म झाला. दशावतारांतील हा सहावा अवतार होय. भृगुकुळातील ऋषि जमदग्नी आणि देवी रेणुका यांचा मुलगा परशुराम ! परशुरामाने केलेल्या अद्वितीय पराक्रमामुळे त्याचे नाव विख्यात होऊन राहिले आहे. तो अत्यंत तेजस्वी असून धनुर्विद्येवर त्याची अलोट भक्ती होती. शंकराच्या कृपेमुळे त्याला कधीही कुंठित न होणारा ‘परशु’ मिळाला होता.
वर्तिकावत् देशाचा राजा ‘चित्ररथ’ याच्याकडे पाहून देवी रेणुकेचे मन बिथरल्याचा संशय ऋषि जमदग्नी यांना आला, तेव्हा तिचा वध करण्यास त्यांनी आपल्या चार मुलांना सांगितले. त्यांपैकी परशुरामाने स्वत:च्या मातेचा वध केला. त्यानंतर पित्याची कृपा संपादन करून रेणुकेस पूर्वीप्रमाणे जिवंतही केले. नर्मदेच्या उत्तर तिरावर ‘कार्तवीर्य’ उपाख्य ‘सहस्रार्जुन’ नावाचा पराक्रमी पुरुष दिग्विजय करत होता. त्याने ब्रह्मनिष्ठ वसिष्ठ ऋषींचा आश्रम जाळून टाकल्यावर वसिष्ठांनी ‘तुझ्या सहस्र बाहूंचे वन परशुराम तोडून टाकील’, असा शाप कार्तवीर्यास दिला आणि ही शापवाणी लवकरच खरी ठरली. सहस्रार्जुनाने जमदग्नी यांच्या आश्रमातील कामधेनु पळवून नेली. इतकेच नव्हे, तर पुढे त्याने परशुराम घरी नसतांना वृद्ध जमदग्नी यांचा २१ वेळा वार करून वध केला.
परशुरामाच्या संतापाने सीमा ओलांडली. त्याने प्रतिज्ञा केली, ‘६ क्षत्रियांचा समूळ नाश करीन’ आणि चित्तात सूड आणि हातांत परशु घेऊन परशुराम घराबाहेर पडला. त्याने कार्तवीर्याच्या सैन्याची धुळधाण उडवली. परशुरामाने आपल्या कुऱ्हाडीने त्याचे सहस्र बाहू खडाखड तोडून टाकले आणि त्याच्या मुलांचाही पराभव केला. त्यानंतर परशुरामाने २१ वेळा क्षत्रियांचा पराभव केला. त्याने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. ‘ब्रह्मविद् ब्राह्मणांना कधी आपत्काळ प्राप्त झाला, तरच मी शस्त्र धारण करीन’, असा त्याचा निश्चय होता. सर्व पृथ्वी हस्तगत केली, तरी त्याला राज्य करावयाचे नव्हते. त्याने एक मोठा यज्ञ केला आणि सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान देऊन ‘तापासा’प्रमाणे महेंद्र पर्वतावर आश्रम स्थापन करून राहिला.
संदर्भ : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’ (लेखक : प्रल्हाद नरहर जोशी, पुणे. (प्रथम आवृत्ती : वर्ष १९५०))